‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्याचा अपघात; थोडक्यात वाचला जीव
'कुमकुम भाग्य' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता झीशान खानच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री उशिरा जिममधून घरी जात असताना त्याचा हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘कुमकुम भाग्य’ या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता झीशान खानचा सोमवारी रात्री मुंबईतील यारी रोडवर अपघात झाला. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास जेव्हा झीशान जिममधून घरी जायला निघाला, तेव्हा त्याचा हा अपघात झाला. समोर येणाऱ्या गाडीची झीशानच्या गाडीला टक्कर लागली. ज्या गाडीने झीशानच्या गाडीला टक्कर दिली, त्यात दोन ज्येष्ठ नागरिक होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. झीशानच्या अपघाताची खबर मिळताच चाहत्यांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.
या अपघातात झीशानला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कळताच चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी अद्याप त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. झीशानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने आर्यन खन्नाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो ‘नागिन’ या मालिकेतही झळकला होता. झीशानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. परंतु हा शो तो जिंकू शकला नव्हता.
View this post on Instagram
बिग बॉसनंतर झीशान पुन्हा छोट्या पडद्यावर दिसला नाही. परंतु त्याचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. झीशान त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत राहिला. त्याचं नाव अभिनेत्री रेहाना पंडितशी जोडलं गेलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे रेहानाने ऑनस्क्रीन झीशानच्या आईची भूमिका साकारली होती. इन्स्टाग्रामवर या दोघांच्या लिपलॉक आणि रोमँटिक क्षणांचे फोटो व्हायरल झाले होते. परंतु या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. परंतु नंतर लगेचच 2024 मध्ये त्यांच्या पॅचअपचीही चर्चा होती.
झीशान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून त्याला महिला चाहतावर्ग मोठा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. झीशानच्या विविध फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. ‘कुमकुम भाग्य’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अकरा वर्षांपासून ती चाहत्यांचं मनोरंजन करतेय.
