आपला मेंदू गहाण का ठेवतो? अशोक खरातप्रकरणी हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा सवाल
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वसामान्यांना प्रश्न विचारला आहे. आपण आपला मेंदू का गहाण ठेवतो, असा सवाल त्याने केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची रोज नवनवी माहिती समोर येत आहे. खरात याच्या मालमत्तांची, त्याच्या दुष्कृत्याची माहिती वाढतच आहे. अनेक महिला या भोंदू खरातच्या जाळ्यात अडकल्या होत्या. परंतु आपण स्वत:ला गंडवून का घेतो, असा सवाल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्रमेश बेटकर याने केला आहे. श्रमेशने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहित सर्वसामान्यांना प्रश्न विचारला आहे. आपल्यात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे.
‘साप म्हटलं की चावणारच, त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा, आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो? आपण स्वत:ला गंडवून का घेतो? याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे,’ अशी पोस्ट श्रमेशने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर माणसाने श्रद्धा ठेवावी, पण त्याने अंधश्रद्ध असता कामा नये, या दोन्ही गोष्टींमधील पुसट रेषा ज्याला त्याला कळायला हवी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याआधी अभिनेता अतुल कुलकर्णीनेही याप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?, असा सवाल त्याने केला होता.
अशोक खरातच्या भोंदुगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसंच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची अंनिसला दाट शंका आहे. सध्या अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीकडून खरातची कसून चौकशी होत आहे.
