‘सैयारा’मुळे वादंग! मनसेचा मल्टीप्लेक्सला खळ्ळखट्याकचा इशारा; शिंदे गटाची धडक
अमेय खोपकर निर्मित 'ये रे ये रे पैसा ३' या सिनेमाचे शो काढून टाकण्यात आले असून सर्वत्र 'सैयारा' सिनेमाचे शो लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मराठी सिनेमांना दिली जाणारी वागणूक ही संतापजनक आहे

सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ या हिंदी प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनेक ठिकाणी तर हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असल्याचे दिसत आहे. पण याच सिनेमाच्या वेळी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, ‘सैयारा’मुळे थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांच्या स्क्रीन्स कमी केल्याने मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
मराठी चित्रपटांच्या स्क्रीन्स कमी करण्याचा आरोप
‘सैयारा’ चित्रपटाला प्राधान्य देत मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’च्या स्क्रीन्स काढून टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे हिंदी-मराठी वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळांमध्ये हिंदीची सक्ती नको, असा विरोध मनसेसह इतर विरोधकांनी केला होता. यानंतर राज्य सरकारने हा आदेश मागे घेतला आणि नव्याने समिती स्थापन केली. हा वाद मिटला असतानाच आता सिनेमागृहातील स्क्रीन्सच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी निर्मित केलेल्या ‘येरे येरे पैसा 3’च्या स्क्रीन्स कमी करण्यात आल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यामागे केवळ राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे.
मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा
संदीप देशपांडे यांनी थिएटर मालकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, मराठी चित्रपटांना योग्य स्क्रीन्स द्याव्या, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने कारवाई करेल. त्यांनी दावा केला की, काही मल्टिप्लेक्स मालक जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची गळचेपी करत आहेत. यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’ला प्राधान्य देत, अमेय खोपकर यांच्या निर्मितीच्या ‘येरे येरे पैसा 3’च्या स्क्रीन्स कमी करण्यात आल्या आहेत. “आम्ही याबाबत बैठक घेतली, पण सध्या यावर जास्त बोलणार नाही,” असे देशपांडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन्स कमी करणे चुकीचे आहे. आम्ही हे सहन करणार नाही. मल्टिप्लेक्स मालकांना आम्ही पक्षातर्फे इशारा देत आहोत की, मराठी चित्रपटांना योग्य संधी द्या.”
अमेय खोपकर काय म्हणाले?
माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही मात्र इथुन पुढे काचा फुटणार. ये रे ये रे पैसा ३ ला चांगला प्रतिसाद मिळतोय… त्याच दिवशी सैय्यारा चित्रपटही प्रदर्शित झाला त्यालाही प्रतिसाद मिळाला. मात्र, दुसऱ्याच आठवड्यात थिएटरमध्ये अक्षरशः एकही शो दिलेला नाही. हा माझ्यावर असलेला राग मल्टीप्लेक्स वाल्यांनी काढला आहे. माझ्या चित्रपटासाठी मीच आंदोलन करावे असे मला वाटत नाही. मात्र इथुन पुढे मल्टीप्लेक्सच्या काचा फुटतील. संजय राऊतांनीही पक्ष न बघता ट्विट केलं. सुशांत शेलारांनीही पाठराखण केली. ज्यांच्यासाठी मी आजवर उभा राहीलो, केसेस अंगावर घेतल्या ते आज एका शब्दानं बोलले नाहीत असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाची धडक
मुंबईतील वांद्रे येथील ग्लोबल मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला जागा न दिल्याबद्दल संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन केले आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन न दिल्याबद्दल तसेच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताच एका आठवड्यात चित्रपट गृहातून काढल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन होणार आहे. परिस्थिती न सुधारल्यास मोठ आंदोलन करण्याचा दिला इशारा.
