KKR टीममुळे शाहरुख खान आयपीएलमध्ये कमावतो तब्बल इतके रुपये
शाहरुख खानच्या आयपीएलमधील केकेआर या टीमवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख या टीममधून किती पैसे कमावतो, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. 2024 मध्ये शाहरुखची ही टीम जिंकली होती.

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानची आयपीएलमधील ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (KKR) ही क्रिकेट टीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उत्तर प्रदेशचे भाजप नेते संगीत सोम यांनी केकेआर टीमसाठी बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला घेतल्याबद्दल शाहरुखवर जोरदार टीका केली आहे. शाहरुखला भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. केकेआर फ्रँचाइजी ही शाहरुख आणि जुही चावला, तिचा पती जय मेहता यांच्या मालकीची आहे. 2024 मध्ये त्यांच्या टीमने आयपीलचा सिझन जिंकला होता. या टीममधून शाहरुख किती कमावतो, याबद्दल जाणून घेऊयात..
शाहरुख खान केकेआरच्या टीममधून भरभक्कम पैसे कमावतो. मिळालेल्या माहितीनुसार, ही कमाई कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. शाहरुखची टीम दरवर्षी आयपीएलमधून 250 ते 270 कोटी रुपये कमावते. त्यापैकी शाहरुख त्याच्या टीमवर 100 कोटी रुपये खर्च करतो. टीम खरेदीपासून ते क्रिकेटर्सच्या इतर सर्व गोष्टींवर तो बऱ्यापैकी खर्च करतो. टीमवर पैसा खर्च केल्यानंतर शाहरुखकडे 150 ते 170 कोटी रुपये राहतात. ही रक्कम शाहरुख आणि त्याच्या पार्टनर्समध्ये विभागली जाते. शाहरुखला केकेआरसाठी बीसीसीआयकडून टीव्ही टेलिकास्ट आणि स्पॉन्सरशिपमधून होणाऱ्या कमाईचा काही भाग मिळतो. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट, मॅच फीज, फ्रँचाइजी फीज, बक्षिसाची रक्कम यातूनही शाहरुखची कमाई होते.
केकेआर टीममुळे शाहरुख खानच्या संपत्तीत उल्लेखनीय वाढ झाल्याचं पहायला मिळतं. ‘हुरुन इंडिया रिच’च्या 2025 च्या रिपोर्टनुसार शाहरुखची एकूण संपत्ती 12 हजार 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. यापैकी बहुतांश कमाई केकेआर टीममुळे होते. जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हेसुद्धा ‘कोलकाता नाइट रायडर्स’चे सहमालक आहेत. यामध्ये शाहरुखचा 55 टक्के हिस्सा आहे. तर जुही चावला आणि जय मेहता यांचा 45 टक्के हिस्सा आहे. सध्या केकेआर टीममधील बांगलादेशी खेळाडूवरून शाहरुख खानवर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशात हिंदूंची हत्या होत असताना आयपीएल लिलावात तिथल्या खेळाडूंना खरेदी केलं जातंय, अशा शब्दांत शाहरुखवर नाराजी व्यक्त केली जात आहे. शाहरुखला भारतात राहण्याचाही अधिकार नाही, अशी टीका त्याच्यावर होत आहे.
