AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan KKR Controversy : एक चूक अन् शाहरुखच्या डोक्यावर टांगती तलवार; रामभद्राचार्यपासून बाबा बागेश्वरपर्यंत अनेकांचा संताप; नेमकं काय आहे प्रकरण?

Shah Rukh Khan KKR Controversy : शाहरुख खान काही हिंदू धर्मगुरूंच्या निशाण्यावर आला आहे. यासाठी त्याचा एक निर्णय कारणीभूत ठरला आहे. आयपीलमध्ये केकेआर टीमसाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय, ते सविस्तर जाणून घ्या..

Shah Rukh Khan KKR Controversy : एक चूक अन् शाहरुखच्या डोक्यावर टांगती तलवार; रामभद्राचार्यपासून बाबा बागेश्वरपर्यंत अनेकांचा संताप; नेमकं काय आहे प्रकरण?
केकेआरच्या वादावरून शाहरुखवर साधला निशाणाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2026 | 1:53 PM
Share

Shah Rukh Khan KKR Controversy : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) त्याच्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (KKR) या टीममुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि सरधानाचे माजी आमदार संगीत सिंह सोम यांनी केकेआर टीममध्ये बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला घेतल्याबद्दल शाहरुखवर जोरदार टीका केली आहे. इतकंच नव्हे तर शाहरुखला भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलंय. शाहरुखसोबतच केकेआर फ्रँचाइजीचे सहमालक अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहतासुद्धा आहेत. या टीममध्ये शाहरुखची 55 टक्के आणि जुही चावला, जय मेहता यांची 45 टक्के भागीदारी आहे. संगीत सोम यांनी शाहरुखला ‘गद्दार’, ‘देशद्रोही’ म्हटल्यानंतर या वादात जगदगुरू स्वामी रामभद्राचार्य, बाबा बाहेश्वर आणि देवकी नंदन यांसारख्या धर्मगुरूंनीही उडी घेतली आहे. हा नेमका वाद काय आहे आणि शाहरुख या सर्वांच्या निशाण्यावर का आला आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

काय म्हणाले संगीत सोम?

“एकीकडे बांगलादेशात हिंदूंची हत्या होत आहे, तर दुसरीकडे आयपीएल लिलावात तिथल्या क्रिकेटपटूंना सर्रास खरेदी केलं जात आहे. शाहरुखने 9 कोटी रुपये खर्च करून बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिजूर रहमानला खरेदी केलंय. बांगलादेशात भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जातात, पंतप्रधानांना शिवीगाळ केली जाते. परंतु शाहरुखसारखे देशद्रोही नऊ कोटी रुपये खर्च करून त्यांना मदत करत आहेत. त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत संगीत सोम यांनी मेरठमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात शाहरुखवर टीका केली. इतकंच नव्हे तर मुस्तफिजूर आयपीएलमध्ये केकेआर टीमकडून खेळण्यासाठी भारतात आला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, त्याला विमानतळाबाहेर पाऊलही टाकू दिलं जाणार आहे, असा धमकीवजा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते पुढे म्हणाले, “बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार केले जातात आणि त्यांची कत्तल केली जाते. त्यांची घरं पाडली जात आहेत आणि त्यांना मारहाण केली जात आहे. भारतीय बहिणी आणि मुलींवर बलात्कार, अत्याचार केले जात आहेत. एकामागोमाग एक हिंदू मारले जात आहेत. हे सर्व पाहूनही जर तुम्हाला या देशातील खेळाडूच टीमसाठी भेटत असेल तर हा भारताविरुद्धचा विश्वासघात आहे. शाहरुख खानसारखे लोक देशद्रोही आहेत. कारण ते वेळोवेळी पाकिस्तान आणि बांगलादेशला पाठिंबा देतात. ते फक्त अशाच देशांना पाठिंबा देतात जे हिंदूंवर अत्याचार करतात. हे गद्दार लोक हे लक्षात ठेवत नाहीत की भारतातील लोकांनी तुम्हाला ‘शाहरुख खान’ बनवलं आहे.” यावर अद्याप शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

मुस्तफिजूर रहमान

आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू

शाहरुख खानच्या केकेआर या आयपीएलमधील टीमने बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला 9 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. हा लिलाव 16 डिसेंबर रोजी पार पडला. तेव्हापासून भारत आणि बांगलादेशमधील ताणलेले संबंध आणि बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या सतत समोर येत आहेत. यावरून काही राजकारणी आणि चाहत्यांनी शाहरुखच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. तेव्हापासून बांगलादेशात आतापर्यंत चार हिंदूंना मारहाण करण्यात आली आहे.

BCCI ची भूमिका काय?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. बीसीसीआयने म्हटलंय की भारत सरकारकडून तसे आदेश मिळाल्यानंतरच ते याविषयी निर्णय घेतील.

या वादात धर्मगुरूंची उडी

संगीत सोम यांच्या टीकेच्या एका दिवसानंतर जगदगुरू स्वामी रामभद्राचार्य, बाबा बागेश्वर आणि देवकी नंदन यांसारख्या धर्मगुरूंनीही शाहरुखवर निशाणा साधला आहे. गुरुवारी नागपुरात अध्यात्मिक गुरू जगदगुरू रामभद्राचार्य म्हणाले, “शाहरुखचा दृष्टीकोन कायमच देशद्रोही राहिला आहे.” तर मुंबईत श्रीमद भागवत कथा सांगणारे कथावाचक देवकीनंतर ठाकूर यांनी शाहरुखला उद्देशून म्हटलं, “या भारतीयांनी आपल्याला हिरो बनवलं आहे, हे शाहरुखने विसरता कामा नये. जी लोकं तुम्हाला हिरो बनवू शकतात, तीच लोकं तुम्हाला झिरोसुद्धा बनवू शकतात.”

“शाहरुखने कधी तिथल्या हिंदूंसाठी ट्विट केलं का? तिथे मारल्या जाणाऱ्या हिंदूंबद्दल त्याने विचार केला का? त्याचा अजेंडा नेहमीच हिंदूविरोधी राहिला आहे”, अशी टीका संत देवेशाचार्य यांनी केली. तर बाबा बागेश्वर उर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “बांगलादेशात अशा अनेक घटना घडत आहेत, ज्या हिंदूविरोधी आहेत. खेळाडूंनी हिंदूंच्या रक्षणासाठी बोललं पाहिजे. तिथल्या लोकांनी आणि बीसीसीआयने हे समजून घेतलं पाहिजे.”

फक्त हिंदू धर्मगुरूंनीच नव्हे तर अलिगडचे शाही प्रमुख मौलाना चौधरी इफ्राहिम हुसैन यांनीसुद्धा शाहरुखवर टीका केली. “बांगलादेशी खेळाडूला टीममध्ये समाविष्ट करण्याचा केकेआरचा निर्णय मानवतेला लाजवेल असाच आहे. कोणत्याही व्यावसायिक किंवा क्रीडा कराराचा निर्णय हा नैतिकतेच्या आधारावर घेतला पाहिजे”, असं ते म्हणाले.

“केंद्र सरकारसमोर मुद्दा उपस्थित केला जाईल”

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा मुद्दा केंद्र सरकारसमोर उपस्थित करणार असल्याचं सांगितलं. “मी शाहरुख खानला विनंती करतो की जर आपल्या देशवासीयांवर बांगलादेशमध्ये अन्याय होत असेल तर आपण त्यांच्या खेळाडूंवर बंदी घालावी, जेणेकरून त्यांना योग्य तो संदेश मिळेल”, असं ते म्हणाले.

काँग्रेसकडून शाहरुखवरील टीकेचा विरोध

एकीकडे शाहरुखवर टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी त्याला ‘गद्दार’ म्हटल्याचा निषेध केला आहे. हा भारताच्या बहुलवादावर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘सुपरस्टार शाहरुख खानला देशद्रोही म्हणणं हा भारताच्या बहुलवादावर हल्ला आहे. कोणत्याही प्रकारचा द्वेष ही राष्ट्रवादाची व्याख्या करू शकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजात विष पसरवणं थांबवावं’, असी पोस्ट त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे.

IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्याबाबद शाहरुखचं काय मत?

ज्या देशाशी भारताचे तणावपूर्ण संबंध आहेत, तिथल्या कलाकारांना आणि खेळाडूंना भारतात काम करू द्यावं की नाही, हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 2009 मधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. 2010 मध्ये शाहरुखने यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. आयपीएलच्या लिलावात पाकिस्तानी खेळाडूंची निवड व्हायला हवी होती, असं तो म्हणाला होता.

“केकेआरचा मालक म्हणून हे घडणं माझ्यासाठी खरोखरच अपमानास्पद आहे. आपण चांगले आहोत, सर्वांना आमंत्रित करण्यासाठी ओळखले जातो आणि आपण ते यापुढेही करायला हवं. जर काही समस्या असतील तर त्यांचं आधीच निराकरण करायला हवं, जेणेकरून सर्वकाही आदराने होऊ शकेल. काही जण अचानक जागे होतील आणि म्हणतील की ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इथे खेळू देणार नाही, मग ते बरोबर असो किंवा चूक. पण इथे काही असे लोक आहेत जे स्पर्धा जिंकण्यासाठी 70, 80, 90 कोटी रुपये खर्च करत आहेत”, अशी प्रतिक्रिया त्याने ‘एनडीटीव्ही’शी बोलताना दिली होती.

KKR टीममधून शाहरुख किती कमावतो?

शाहरुख खान केकेआरच्या टीममधून भरभक्कम पैसे कमावतो. ही कमाई कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. शाहरुखची टीम दरवर्षी आयपीएलमधून 250 ते 270 कोटी रुपये कमावते. त्यापैकी शाहरुख त्याच्या टीमवर 100 कोटी रुपये खर्च करतो. टीम खरेदीपासून ते क्रिकेटर्सच्या इतर सर्व गोष्टींवर तो बऱ्यापैकी खर्च करतो. टीमवर पैसा खर्च केल्यानंतर शाहरुखकडे 150 ते 170 कोटी रुपये राहतात. ही रक्कम शाहरुख आणि त्याच्या पार्टनर्समध्ये विभागली जाते. शाहरुखला केकेआरसाठी बीसीसीआयकडून टीव्ही टेलिकास्ट आणि स्पॉन्सरशिपमधून होणाऱ्या कमाईचा काही भाग मिळतो. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट, मॅच फीज, फ्रँचाइजी फीज, बक्षिसाची रक्कम यातूनही शाहरुखची कमाई होते.

भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?
UTS ॲप बंद! लोकल तिकीट अन पासची सुविधा कायमस्वरूपी बंद, पर्याय काय?.
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?
हे काय भयानकच प्रकरण! चक्क उमेदवारी अर्जच गिळला... पुण्यात चाललंय काय?.
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव
पुण्यात गुन्हेगारांना तिकीट अन् अजित पवार यांची सारवासारव.
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?
नाशिकनंतर पुण्यात दादांची NCP अन् शिंदे सेना भाजपविरोधात एकत्र येणार?.
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल
सायनमध्ये AB फॉर्मचा झोल अन् भाजप उमेदवारच नॉट रिचेबल.
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद
मुंबई महापौर पदावरून राजकीय रणकंदन, वारिस पठाण यांच्या विधानानं वाद.
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल
भाजपच्या ट्रोलिंगनं पूजा मोरेंची माघार अन् रडारड... जुने Video व्हायरल.