हेमा मालिनी यांचं कौतुक झालं असेल तर धर्मेंद्रजींबद्दल सांगा..; शत्रुघ्न सिन्हा ट्रोल
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतीच हेमा मालिनी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. परंतु या भेटीचा फोटो पोस्ट केल्यानंतर ते ट्रोल झाले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी जे लिहिलं, ते वाचून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानीच उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते व्हेंटिलेटरवर असल्याचीही माहिती होती. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर विविध सेलिब्रिटींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. ज्येष्ठ अभिनेते आणि धर्मेंद्र यांचे खास मित्र अमिताभ बच्चनसुद्धा त्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नीसोबत हेमा मालिनी यांची भेट घेतली आहे. पत्नी पूनम सिन्हासोबत ते हेमा मालिनी यांना भेटायला गेले होते आणि यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतलं. या भेटीचा फोटो त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मात्र या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी जे लिहिलंय, त्यावरून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांची पोस्ट-
‘माझी ‘बेस्ट हाफ’ (अर्धांगिनी) पूनम सिन्हासोबत आमची सर्वांत प्रिय फॅमिली फ्रेंड, सर्वोत्तम माणसांपैकी एक, सर्वोत्तम स्टार/अभिनेत्री, उत्कृष्ट दर्जाची कलाकार, एक सक्षम खासदारांना भेटण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी गेलो होतो. आमच्या प्रार्थना त्या सर्वांसोबत आहेत. आम्ही ‘त्यांच्या’ आमच्या मोठ्या भावाच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याची विचारपूस केली’, असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. याच कॅप्शनवरून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
Along with my ‘bestest half’ @PoonamSinha went to meet, greet & God Bless, our very dear family friend, one of the finest human beings, star/actress, par excellence, artist of the highest calibre, an able Parliamentarian @dreamgirlhema Our prayers are with them all & we inquired… pic.twitter.com/yc0pfHkpT2
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 17, 2025
‘हेमा मालिनी यांचं कौतुक झालं असेल तर धर्मेंद्रजींच्या प्रकृतीविषयी काहीतरी सांगा’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही पोस्ट धर्मेंद्रजींच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी होती की हेमा मालिनी यांचं कौतुक करण्यासाठी’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. आम्हाला धर्मेंद्रजींच्या तब्येतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, असं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय.
89 वर्षीय धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार घरीच करण्यात येणार असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली. डॉक्टर प्रतित समदानी यांनीही कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांना घरी पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विविध चर्चा होत असताना देओल कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून गोपनीयतेची विनंती केली. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केलं.
