तर तू कसला बाप? सुनीता अहुजाने गोविंदाच्या जिव्हारी लागणारे शब्द का वापरले?
गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुलाखतींमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. नुकत्याच एका मुलाखतीत सुनीताने मुलाचं करिअर घडवण्यावरून गोविंदाला सुनावलं.

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा तिच्या खासगी आयुष्याविषयी बेधडकपणे व्यक्त होत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने पुन्हा एकदा गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं. वयाच्या 63 व्या वर्षी असं काही करणं शोभतं का, असा सवाल तिने केला. इतकंच नव्हे तर गोविंदाने त्याच्या मुलांना करिअर घडवण्यासाठी मदत केली नसल्याची तक्रार तिने बोलून दाखवली. तर दुसरीकडे मुलांनी स्वत:च्या कर्तृत्त्वावर करिअर घडवावं, असं गोविंदाचं मत आहे. सुनीताने मात्र याचा स्पष्ट विरोध केला. “स्वत:च्या मुलांची मदत करू शकला नाही तर तू कसला बाप”, असे जिव्हारी लागणारे शब्द तिने गोविंदासाठी वापरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गोविंदाचं वैवाहिक आयुष्य चर्चेत आलं आहे.
याविषयी सुनीता म्हणाली, “माझा मुलगा यशवर्धनने त्याच्या वडिलांकडून कोणतीच मदत घेतली नाही. त्याने एका आऊटसाइडरप्रमाणेच 90 ऑडिशन्स दिले आहेत. त्याने गोविंदाला कोणालाही फोन करायला सांगितलं नाही. मी त्याच्या तोंडावर म्हटलंय की, तू बाप आहेस.. तू मदत नाही करणार तर कोण करणार? कारण तुम्ही अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी या सर्वांना बघा.. सर्वजण त्यांच्या मुलांची मदत करतात. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? माहीत नाही तू कोणत्या लोकांसोबत राहतो, ते तुला काय शिकवतात? त्यांच्या नादात तू स्वत:चंही करिअर उद्ध्वस्त केलंस.”
View this post on Instagram
सुनीताने तिचा मुलगा यशवर्धनला वडिलांसारखं बनू नकोस, असा सल्ला दिला आहे. “मी माझ्या मुलाला समजावलंय की तू तुझ्या बापाला कॉपी करू नकोस. जेव्हा यश माझ्या पोटात होता, तेव्हा मी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बरेच चित्रपट पहायची. तो त्यांच्यासारखाच आहे”, असं सुनीता पुढे म्हणाली.
पत्नी सुनीताच्या आरोपांवर गोविंदाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “मी अत्यंत शांत स्वभावाचा माणूस आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांविरोधात कट रचला जातोय. मी माझ्या क्षमतेनुसार काम करतोय. मी निर्माते किंवा दिग्दर्शकांशी माझ्या मुलांबद्दल बोलत नाही. ही इंडस्ट्री माझं कुटुंब आहे. जिथे मी पैसा आणि प्रसिद्ध कमावतो, त्यामुळे मी तिला कलंकित करू इच्छित नाही. पण या इंडस्ट्रीत सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे, कारण या गोष्टी विनाकारण घडत नाहीत. एक कट रचला जातोय. लोक माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं तो म्हणाला.
