टीव्ही इंडस्ट्री सोडून अभिनेत्री बनली संन्यासी, गुहेत-जंगलात तपस्या, भीक्षा मागून काढले दिवस
टीव्ही इंडस्ट्री सोडून या प्रसिद्ध अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. कधी गुहेत तर कधी जंगलात तिने ध्यानसाधना केली. संन्यास स्वीकारल्यानंतर आयुष्यात काय बदल झाले, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अचानक ग्लॅमर विश्वाला रामराम केला आणि अध्यात्माचा मार्ग अवलंबला. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नुपूर अलंकार. नुपूर ही एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु 2022 मध्ये तिने अचानक कलाविश्व सोडण्याचा निर्णय घेतला आणि अध्यात्माच्या मार्गाचा स्वीकार केला. नुपूर आता एका संन्यासीचं आयुष्य जगतेय. गेल्या तीन वर्षांत तिने तिच्या आयुष्यात बरेच मोठे बदल केले आहेत. साध्वी बनल्यानंतर आयुष्य कशाप्रकारे बदललंय, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
नुपूर म्हणाली, “एका तीर्थक्षेत्रापासून दुसऱ्या तीर्थक्षेत्रापर्यंत प्रवास करण्यात, ध्यानसाधना करण्यात आणि देवाचं नामस्मरण करण्यात माझं आयुष्य व्यतित होत आहे. जर मी प्रत्येक जागेचं नाव घेतलं, तर ही यादी संपणारच नाही. माझ्या आयुष्यातील हे तीन वर्ष पूर्णपणे देवाला समर्पित होते.” नुपूरने जेव्हा सांसारिक मोह-मायेचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ती तिच्या वैयक्तिक समस्यांपासून दूर पळण्यासाठी असा निर्णय घेत असल्याचं लोकांना वाटलं होतं.
याविषयी नुपूरने पुढे सांगितलं, “गोष्टींकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन खूप वेगळा असतो. कदाचित त्यांना एकेदिवशी हे समजेल की माझा हा निर्णय फक्त काही काळापुरता नाहीये. मला मुंबई किंवा फिल्म इंडस्ट्रीची अजिताब कमतरता जाणवत नाही. मला जितकं काम करायचं होतं, मी केलं. मला जे भेटायचं होतं, ते सर्व भेटलंय. आता मला खूप हलकं वाटतंय. कारण अखेर मी आता अशा ठिकाणी आहे, जिथे मला असायला हवं. सर्वांशी संपर्क तोडून मी ध्यानसाधनेत मग्न होती. मी अशा ठिकाणी राहिली, जिथे वीज नव्हती, जिथे दैनंदिन गरजांसाठी भीक मागावी लागली. माझा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला.”
साध्वी बनल्यानंतर दैनंदिन जीवनाचा खर्च कसा भागवतेस, असा प्रश्न नुपूरला विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं, “उलट आता सर्वकाही खूप सोपं झालंय. आधी मला खूप सारी बिलं भरावी लागत होती. लाइफस्टाइल, कपडे यांचा खर्च होता. डाएटची चिंता होती. मी आता दहा ते वीस हजारात महिन्याचा खर्च भागवते. वर्षातून कधीतरी भिक्षाटनची प्रथाही अवलंबते. भिक्षा मागून मी त्याचं अर्पण देवाला आणि गुरूंना करते. याने माझा अहंकार नाहीसा होतो. माझ्याकडे फक्त चार ते पाचच कपडे आहेत. मी गुहेत, जंगलात आणि उंच पर्वतांवरही राहिले. शरीर थरथरणाऱ्या थंडीत दिवस काढले आहेत. कठोर तपस्येमुळे माझं शरीर कमकुवत झालंय. आता मी एक सेवक आहे आणि माझी काही कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी मी परत आली आहे. अध्यात्माबद्दल मी आता लोकांचं मार्गदर्शन करणार आहे.”
