H- 1B Visa : चीनने गुपचूप गेम केला! डोनाल्ड ट्रम्प चेकमेट, भारताला दिली मोठी ऑफर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला आहे. सोबतच त्यांनी एचवनबी व्हिसा मिळवण्यासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. असे असतानाच आता चीनने मोठी खेळी केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Donald Trump H-1B Visa Rules : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला होता. या एका निर्णयाचा भारतातील अनेक उद्योगांना फटका बसला. अजूनही हा निर्णय मागे घेण्यात आलेला नसून त्याचा परिणाम थेट भारतावर पडतो आहे. दुसरीकडे आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसाचे शुल्क तब्बल 88 लाख रुपये केले. H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करणाऱ्यांमध्ये भारतीय तरुण-तरुणींचे प्रमाण तब्बल 71 टक्के आहे. त्यामुळे या निर्णयाचादेखील भारतलाच सर्वाधिक फटका बसत आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांच्या या आततायी धोरणामुळे भारताला फटका बसत असला तरी आता अनेक देश भारताच्या मदतीला येत आहेत. ट्रम्प यांच्या H-1B व्हिसासंदर्भातील निर्णयानंतर आता चीनने एक थेट आणि मोठी ऑफर दिली आहे.
अमेरिकेच्या निर्णयामुळे होणार चीनला फायदा?
चीनच्या या भूमिकेनंतर आता भारतीय तरुणांना करिअर घडवण्यासाठी तसेच नव्या संधी शोधण्यासाठी अमेरिकेव्यतिरिक्त एक नवा पर्याय खुला झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अमेरिकेने H-1B व्हिसासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फायदा घेण्याची तयारी चीनने चालू केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी भारताचे नव न घेता भारतातील अभियंते तसेच कुशल कामगारांना चीनमध्ये आमंत्रण दिले आहे.
चीनने नेमकी काय ऑफर दिली?
करिअरमध्ये पुढे जायचे असेल आणि मानवतेच्या प्रगतीसाठी चीनमध्ये या असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केले आहे. भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचा हवाला देत भारतातील कुशल कामगारांना चीनमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्स या सोशल मडिया मंचावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या जगात तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी बुद्धीमत्तेने एका देशातून दुसऱ्या देशात जाणे गरजेचे आहे. चीन वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धीवंतांचे स्वागत करतो. त्यांनी स्वत:च्या प्रगतीसाठी तसेच मानवतेच्या विकासासाठी चीनमध्ये यावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचे मत असल्याचे यू जिंग यांनी म्हटले आहे.
Spokesperson of MOFA: In a globalized world, cross-border flow of talents is instrumental in global technological and economic advancement.
China welcomes talents from various sectors and fields across the world to come and find their footing in China for the progress of… pic.twitter.com/ZiLNsmj0Vw
— Yu Jing (@ChinaSpox_India) September 23, 2025
दरम्यान, चीनची ही भूमिका समोर आल्यानंतर आता भारतातील इंजिनिअर्स, टेक क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल कामगारांना अमेरिकेऐवजी चीन हा चांगला पर्याय असू शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
