विमानात पत्नीची अशी कृती; त्यामुळे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची जगभरात बदनामी
एका व्हायरल व्हिडीओमुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना कानाखाली मारल्याचा दावा केला जात आहे. त्यावर खुद्द मॅक्रॉन यांनी मौन सोडलं आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या व्हिएतनाम दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन त्यांच्या गालावर चापट मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांदरम्यान आता खुद्द इमॅन्युएल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना मॅक्रॉन म्हणाले, “या मुद्द्याला विनाकारण जास्त महत्त्व दिलं जातंय. मी आणि माझी पत्नी भांडत होतो, पण भांडणापेक्षा जास्त त्यात विनोदच होता. आम्ही फक्त मस्करी करत होतो.”
व्हायरल व्हिडीओवरून होणाऱ्या चर्चेबद्दल ते पुढे म्हणाले, “हे प्रकरण आता एक प्रकारची आपत्तीच बनली आहे. काही लोक तर तत्त्वांबद्दलही बोलू लागले आहेत. मी यासाठी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना जबाबदार मानतो. अशा लोकांचा हेतू आमच्यातील हलकाफुलका क्षण खराब करण्याचा होता. लोक फक्त राईचा पर्वत बनवत आहेत. गेल्या काही आठवड्यांत हे पहिल्यांदाच घडलं नाही.”
“एका व्हिडीओमध्ये मी एक टिश्यू घेतला आणि कोणाशी तरी हात मिळवत होतो. त्याचवेळी मी माझ्या पत्नीसोबत मस्करी केली. असं आपण अनेकदा करतो. त्यात नवीन काही नाही”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. या जुन्या व्हायरल व्हिडिओमध्ये मॅक्रॉन हे टेबलावरून एक पांढरी वस्तू बाहेर काढताना दिसत होते. सोशल मीडियावर अनेकांनी तो व्हिडीओ शेअर करत त्याला कोकेनची पिशवी असल्याचं म्हटलं होतं. परंतु ते एक टिश्यू होतं.
View this post on Instagram
काय आहे संपूर्ण घटना?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं विमान रविवारी व्हिएतनामची राजधानी हनोई इथं उतरलं. या विमानाचा दरवाजा उघडताच मॅक्रॉन तिथे उभं असल्याचं दिसलं आणि त्यानंतर त्यांची पत्नी ब्रिजिट त्यांच्या तोंडावर थाप मारताना दिसल्या. यानंतर मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर चकीत झाल्याचे हावभाव स्पष्ट दिसतात. परंतु क्षणभरातच ते स्वत:ला सावरतात आणि पत्नीला सोबत घेऊन विमानातून उतरतात. यादरम्यान पायऱ्या उतरताना मदत करण्यासाठी मॅक्रॉन त्यांच्या पत्नीसमोर हात पुढे करतात. परंतु ब्रिजिट त्यांचा हात धरत नाहीत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या एलिसी पॅलेसकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. ‘ही घटना वादग्रस्त नसून तो केवळ एक खासगी आणि गमतीशीर क्षण होता. हा तो क्षण होता, जेव्हा राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी दौरा सुरू करण्यापूर्वी मूड थोडं हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न करत होते’, असं त्यांनी म्हटलंय. यात काहीही गंभीर बाब नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
