मोठी बातमी! घडामोडींना वेग, इराणच्या नेतृत्वात बदल, खामेनींच्या निर्णयाने वेधले जगाचे लक्ष
Iran vs US : अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता खामेनी बंकरमध्ये लपले आहेत. त्यानंतर आता इराणच्या नेतृत्वात बदल झाला आहे.

गेल्या काही काळापासून इराणमध्ये अशांतता आहे. जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. त्यावेळी अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला इराणी सरकारविरोधात आंदोलन झाले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर खामेनी यांच्याबाबत एक महत्त्वाचा अहवाल समोर आला होता. वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी खामेनींच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अमेरिकेच्या संभाव्य हवाई हल्ल्याच्या भीतीने खामेनी एका भूमिगत बंकरमध्ये लपून बसलेले आहेत. त्यानंतर आता इराणच्या नेतृत्वात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणच्या नेतृत्वात बदल
समोर आलेल्या माहितीनुसार 86 वर्षीय खामेनी तेहरानमधील एका सुरक्षित बंकरमध्ये लपून बसलेले आहेत. हे बंकर अनेक गुप्त भूमिगत बोगद्यांशी जोडलेले आहे. जूनमध्येही खामेनी या बंकरमध्ये लपले होते. आता यूएसएस अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रुप पर्शियन आखाताकडे जात आहे, त्यामुळे इराणवर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता इराणच्या नेतृत्वात बदल झाल्याचे समोर आले आहे. खामेनी यांनी देशाची दैनंदिन प्रशासकीय कामे धाकटा मुलगा मसूद खामेनी यांच्याकडे सोपवली आहेत. आता 53 वर्षीय मसूद खामेनी महत्त्वाच्या घटनांवर लक्ष ठेवणार आहेत.
ट्रम्प यांचा नौदलाला आदेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत युद्धनौका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. इराणला हा गंभीर इशारा आहे. सध्या तीन युद्धनौकांचा समावेश असलेला अब्राहम लिंकन स्ट्राइक ग्रुप हिंदी महासागरातून पर्शियन आखाताकडे जात आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराणचा झुकण्यास नकार
इराणने अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर अमेरिका किंवा इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेते खामेनी यांच्यावर हल्ला केला तर ते इराणविरुद्ध युद्ध मानले जाईल. इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने इशारा दिला आहे की खमेनींवर हल्ला झाल्यास जिहाद घोषित केला जाईल. त्यामुळे आगामी काळात अमेरिका आणि इराणमधील युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
