जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ठार, इराक-अमेरिकेचं मोठं मिशन
इराकी गुप्तचर सेवा आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने इराक आणि सीरियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला ठार केल्याची माहिती इराकी लष्कराने दिली आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी ट्विटरवर दावा केला आहे की, अब्दुल्ला माकी मुसलेह अल-रिफाई उर्फ अबू खदीजा मारला गेला आहे.

इराक आणि सीरियातील इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल्ला माकी मुसलेह अल-रिफाई ऊर्फ अबू खदीजा ठार झाला आहे. अबू खदीजा हा इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. या दहशतवाद्याचा खात्मा करण्याच्या महत्त्वाच्या सुरक्षा यशाबद्दल आम्ही इराकी जनतेचे आणि सर्व शांतताप्रिय लोकांचे अभिनंदन करतो, असं इराकच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
इराकच्या पंतप्रधानांनी शुक्रवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी सांगितले की, त्यांच्या देशाच्या गुप्तचर सेवा आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या संयुक्त कारवाईत खदीजा ठार झाला.
पश्चिम इराकच्या अनबार प्रांतातील खदीजाच्या तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले करून ही कारवाई करण्यात आली. बशर अल असद यांच्या पतनानंतर सीरियात ISIS च्या उदयाबद्दल इराकी अधिकारी चिंतेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी ट्विटरवर लिहिले की, “इराकींनी दहशतवादाच्या शक्तींवर आपला प्रभावी विजय कायम ठेवला आहे. दहशतवादविरोधी लढाईत ऑपरेशन कमांडच्या पथकाने आणि आंतरराष्ट्रीय आघाडीच्या सैन्याने अब्दुल्ला माकी मुसलेह अल-रिफाईचा खात्मा केला आहे. रिफाईला अबू खदीजा या नावानेही ओळखले जायचे. तो इस्लामिक स्टेट या त्याच्या गटाचा उपखलिफा होता. इराक आणि सीरियाचे तथाकथित गव्हर्नर आणि आयएसमधील फॉरेन ऑपरेशन ऑफिसचा तो प्रमुख होता.
खदीजा इराकचा मोस्ट वॉन्टेड व्यक्ती
अबू खदीजा हा इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. या दहशतवाद्याचा खात्मा करण्याच्या महत्त्वाच्या सुरक्षा यशाबद्दल आम्ही इराकी जनतेचे आणि सर्व शांतताप्रिय लोकांचे अभिनंदन करतो. इराकमध्ये इस्लामिक स्टेटशी लढणारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीची लष्करी मोहीम सप्टेंबरपर्यंत संपुष्टात आणण्याचा करार अमेरिका आणि इराकमध्ये झाला आहे. मात्र, अमेरिकी सैन्य इराकमधून बाहेर पडण्यापूर्वी ISIS ची चिंता पुन्हा वाढली आहे.
सीरियातील ISIS च्या वाढत्या ताकदीमुळे इराकी अधिकारी गेल्या काही काळापासून चिंतेत आहेत. सीरियात सुरू असलेल्या अशांततेमुळे या दहशतवादी संघटनेला पुन्हा उदयास येण्याची संधी मिळू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सीरियाचे हंगामी परराष्ट्रमंत्री असद हसन अल-शिबानी यांनी बगदादमध्ये इराकच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा बराचसा भाग इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईवर केंद्रित असल्याचे सांगितले जाते. इराक सरकारला सीरियाकडून ISIS विरुद्धच्या लढाईत मदतीची अपेक्षा आहे.