‘ऊँ गं गणपतये नमः’, गणेश स्तुतीने पंतप्रधान मोदींचे ब्राझीलमध्ये स्वागत, ब्राझिलियन पथकाने केले चकीत
PM Narendra Modi in Brazil : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स महासंमेलनासाठी ब्राझीलच्या दौर्यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी अर्जेटिना देशाला भेट दिली. या दोन्ही देशात त्यांचे ग्रँड वेलकम करण्यात आले. भारतीय परंपरेचे त्यांना पदोपदी दर्शन घडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे दाखल झाले. या ठिकाणी 17 वे ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. या शिखर संमेलनात ते सहभागी होतील. यावेळी ब्राझिलियन संगीतकारांनी त्यांना विस्मयचकीत केले. त्यांनी ऊँ गं गणपतये नमः आणि “जय जगदंबा माँ दुर्गा” चे सादरीकरण करून सर्वांनाच अचंबित केले. पंतप्रधान या नादब्रह्मात डोलताना दिसले. त्यांनी या संगीतकारांचे कौतुक केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय संस्कृती, परंपरा यांचा परदेशातील सुंदर रूप समोर आले.
ब्राझीलमध्ये दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर होते. गेल्या 57 वर्षांत भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हियर मिलेई यांना भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. व्यापार, संरक्षण, खनिजे, औषधनिर्माण, ऊर्जा आणि खाणकाम या क्षेत्रात दोन्ही देशांनी सहकार्य वाढवण्यावर भर दिला. दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.
अर्जेंटिनाची यशस्वी दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर अर्जेटिंनाचा दौरा यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. त्यांनी या दौऱ्याविषयीचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला. “मला विश्वास आहे की ही भेट द्विपक्षीय मैत्रीला अधिक चालना देईल. दोन्ही देशातील अपार संभावनांना गती देतील. मी अध्यक्ष मिलेई, अर्जेंटिनाचे सरकार आणि तिथल्या जनतेचे त्यांच्या आत्मीय स्वागतासाठी आभार मानतो.” असे त्यांनी लिहिले आहे.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हिएर मिलेई यांच्यात कृषी, हरित ऊर्जा, डिजिटल नवकल्पना, क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढीवर जोर देण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर अर्जेंटिना भारताच्या बाजूने भक्कम उभा राहिला, त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाचे आभार मानले.
भारतीय औषधांना अर्जेंटिनामध्ये सुलभ प्रवेश मिळावा यासाठी नियमात सुधारणा करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. डिजिटल पेमेंट मॉडेल, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचे (UPI) सादरीकरण करण्यात आले. अर्जेंटिनाचे अध्यक्ष मिलेई यांनी आर्थिक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रयोगात विशेष रूची दाखवली.