पाकिस्तान हादरला! सर्वात मोठा बॉम्बस्फोट, क्षणात…लोकांमध्ये दहशत
पाकिस्तान देशात नेहमीच काहीतरी घडत असते. आता तिथे एक दक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तिथे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तपास सुरू आहे.

Pakistan Bomb Blast : भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये महागाई, पैशांची चणचण या मुख्य समस्या आहेत. इथे अगोदरच लोकांपुढे अनेक अडचणी आहेत. असे असताना त्या देशातील दहशतवादी कारवाया हादेखील मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये अनेकदा बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटना घडेलल्या आहेत. त्यांच्याच देशातील काही फुटीरवादी संघटनांकडून अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले जातात. दरम्यान, आता पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये असाच एक भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात तब्बल 10 लोकांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या जखमी लोकांवर उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा इथे ही घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात एकूण 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून 30 लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा एक शक्तिशाली बॉम्बस्फोट होता. स्फोट होताच सर्वत्र आगीचे लोळ पसरले. स्फोटाची भीषणता लक्षात घेता घटनास्थळाजवळील रुग्णालयात आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली असून आरोग्यसेवेच्या सर्वच सेवांसाठी डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफला तत्पर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
घर, व्यावसायिक इमारतींच्या काचा फुटल्या
या बॉम्बस्फोटाबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार क्वेटा शहरातील पूर्व भागात फ्रंटियर कॉर्प्सचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबारही झाला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर घटनास्थळाजवळील घरे, व्यावसायिक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
#QuettaBlast CCTV footage Highly condemnable pic.twitter.com/BDaaA4VBn8
— Haroon Baloch, PhD (@advertbalcha) September 30, 2025
बॉम्बस्फोटाचे नेमके कारण काय?
दरम्यान, हा बॉम्बस्फोट नेमका कोणी घडवून आणला, यामागे नेमका कोणाचा हात आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर आता बलुचिस्तान परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
