Pakistan Sanskrit : पाकिस्तानात थेट संस्कृत शिकवली जाणार, नव्या निर्णयाची चर्चा!
आता पाकिस्तानात संस्कृत शिकवली जाणार आहे. विशेष म्हणजे येथे महाभारत आणि भगवद्गीतेवरही धडे दिले जात आहे. पाकिस्तानातील एका विद्यापीठाने याबाबत एक निर्णय घेतला आहे.

India Pakistan : सध्या भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. या दोन्ही देशांमध्ये सध्या मोठा दुरावा आलेला आहे. राजकीय धोरण, संरक्षणविषयक विचार वेगळे असल्यामुळे सध्या या दोन्ही देशांमध्ये व्यापार तसेच इतर कोणत्याही पातळीवर व्यवहार सुरू नाहीत. असे असले तरी पाकिस्तान हा देश भारताच्या फळणीतूनच तयार झालेला आहे. या दोन्ही देशांचा सांस्कृतिक वारसा कधीकाळी एकच होता. अजूनही पाकिस्तानातील अनेक पूर्वजांचे जन्मस्थळ हे भारतात आहे आणि सध्या अनेक भारतीय नागरिकांच्या पूर्वजांचे जन्मगाव पाकिस्तानमध्ये आहे. दोन्ही देशात एक वेगळा भावबंध आहे. असे असतानाच आता पाकिस्तानमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानमधील एका महाविद्यालयात थेट संस्कृत हा विषय शिकवला जणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात येथे महाभारत आणि भगवद्गीतादेखील शिकवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निर्णयाद्वारे दोन्ही देशांची संस्कृती जाणून घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे?
लाहोर यूनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसने (LUMS) पारंपरिक भाषांचे एकूण चार क्रेडिट कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये संस्कृत हा एक क्रेडिट कोर्स आहे. फॉरमॅन ख्रिश्चियन कॉलेजमधील समाजशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक शाहीद रशीद यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. याच प्रयत्नांना आता यश आले आहे. ते स्वत: संस्कृतमधील एक विद्वान मानले जातात. द ट्रिब्यूनने याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार पारंपरिक भाषांमध्ये ज्ञानाचा सागर आहे. मी अगोदर अरबी आणि फारशी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर मी संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू केला. संस्कृतचे व्याकरण समजून घ्यायला मला एक वर्ष लागले, अशी भावना शाहीद रशीद यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानातील मुस्लीम संस्कृत शिकतील
पुढे बोलताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशात संस्कृत भाषेवर काम झाले तर चित्र वेगळे असेल. आता भारतातील हिंदू आणि शीख धर्मीय पारशी, अरबी भाषा शिकतील आणि पाकिस्तानातील मुस्लीम संस्कृत शिकतील. यामुळे दक्षिण आशियात भाषेचा एक वेगळा सेतू निर्माण होईल. भाषेला सीमा नसते, असे ही मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, LUMS चे गुरमानी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासीम यांनी लवकरच महाभारत आणि भगवद्वगीतेवर कोर्स सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे, असे सांगितले. तसेच आगामी 10 ते 15 वर्षात पाकिस्तानत गीता आणि महाभारत यांच्यातील विद्वान तयार होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
