जगात सर्वाधिक वापरला जाणारा शब्द ‘OK’ कसा झाला एवढा लोकप्रिय?
"OK" हा छोटासा शब्द, जो आपण दररोज बोलतो, मेसेजमध्ये लिहितो, किंवा नुसता अंगविक्षेपाने दाखवतो... पण कधी विचार केला आहे का, या शब्दाची सुरुवात नेमकी कशी झाली? चला, जाणून घ्या एका विनोदातून जन्मलेला, पण आज जगाच्या संवादाची भाषा बनलेला 'OK' शब्दाचा भन्नाट प्रवास.

आज इंटरनेटच्या युगात, ‘OK’ हा शब्द जगभरातील जवळपास सर्व भाषांमधील लोकांना परिचित आहे. एखाद्या अनोळखी देशात फिरताना, जरी ‘प्लीज’ किंवा ‘थँक यू’ जमत नसलं तरी ‘OK’ म्हटल्यावर समोरचा हसून प्रतिसाद देतो. पण कधी विचार केलात का की हा छोटासा शब्द एवढा मोठा कसा झाला? आणि विशेष म्हणजे, याची सुरुवात झाली एका साध्याशा विनोदाने!
OK शब्दाचा उगम 1839 साली अमेरिकेतील ‘Boston Morning Post’ या वृत्तपत्रात झाला. त्या काळात इंग्रजी वृत्तपत्रांत एक मजेशीर ट्रेंड होता जाणूनबुजून चुकीचे शब्द लिहिणे! उदाहरणार्थ, ‘All Correct’ याऐवजी ‘Oll Korrect’. आणि याचे संक्षिप्त रूप ‘O.K.’ असं लिहिलं जाऊ लागलं.
त्याच वर्षी एका लेखात लिहिलं गेलं होतं
“…et ceteras, O.K.all correct and cause the corks to fly…”
याच विनोदातून O.K. चा जन्म झाला आणि हळूहळू लोकांच्या बोलण्यात रूळू लागला.
‘OK’ शब्द एका वेळेस विस्मरणात जाईल असं वाटत होतं, पण 1840 च्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीने याला पुन्हा जीव दिला. त्या वेळी उमेदवार मार्टिन वॅन ब्युरेन यांना त्यांच्या गावाच्या नावावरून ‘Old Kinderhook’ म्हणत असत. त्यांच्या समर्थकांनी ‘OK Club’ नावाची संघटना स्थापन केली आणि नारा दिला “We’re OK!” तिथून OK हा शब्द संपूर्ण अमेरिकेत, आणि नंतर हळूहळू संपूर्ण जगभर पोहोचला.
OK शब्दाच्या उत्पत्तीबद्दल अनेक सिद्धांत आहेत. काही भाषाशास्त्रज्ञांनी तो चॉकटॉ (Choctaw) जमातीतील ‘okeh’ या शब्दाशी जोडला. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती वुडरो विल्सन हे ‘OK’ ऐवजी ‘okeh’ लिहायचे! मात्र भाषाशास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं की OK हा ‘Oll Korrect’ या हास्यात्मक अपभ्रंशाचा संक्षेप आहे.
आज ‘OK’, ‘Okay’ किंवा ‘ok’ हे तिन्ही प्रकार वापरले जातात आणि तिन्ही योग्य मानले जातात. काहीजण ‘Okay’ अधिक फॉर्मल मानतात, पण खऱ्या इतिहासात ‘OK’ हाच मूळ आणि अधिक प्रमाणबद्ध शब्द आहे. प्रसिद्ध लेखिका लुईसा मे अल्कॉट ह्यांनी देखील त्यांच्या पुस्तकात ‘Okay’ शब्द वापरला होता, पण नंतरच्या आवृत्त्यांत त्या शब्दाची जागा ‘cozy’ ने घेतली.
थोडक्यात सांगायचं झालं, तर OK हा शब्द एका मजेशीर विनोदाने जन्माला आला, पण आज तो जगभराचा संवादाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. टेक्नॉलॉजी, चॅट, ईमेल, कॉल्स, अगदी आपल्या दैनंदिन संभाषणातही ‘OK’ न म्हणता कामच चालत नाही. एका साध्याशा चूकलेखनातून सुरू झालेला ‘OK’, आज जगभरातील लोकांच्या भावनांचा ‘पॉझिटिव्ह सिग्नल’ बनला आहे.
