कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

भारतातील औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची (उदा. सिरम, भारत बायोटेक) कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आहे.

कोरोनाची लस सर्वांना मोफत मिळणार; केरळ सरकारची मोठी घोषणा

कोची : जगभरातील सर्वच देश कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही देशांनी कोरोनावरील प्रभावी लस (Corona Vaccine) बनवली आहे, तर काही देशांची लस अंतिम टप्प्यात आहे. अनेक देशांनी अमेरिकेची कंपनी Pfizer च्या कोरोनावरील लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या लसीचा भारतातही आपत्कालीन वापर करता यावा यासाठी Pfizer ने भारत सरकारने परवानगी मागितली आहे. दुसऱ्या बाजूला भारतातील औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची (उदा. सिरम, भारत बायोटेक) कोरोनावरील लसदेखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच कोरोनावरील लस उपलब्ध होईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हील लस किती रुपयांना मिळणार? आणि लस आधी कोणाला मिळणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मोठी घोषणा केली आहे. केरळमधील सर्व नागरिंकाना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा विजयन यांनी नुकतीच केली आहे. (Corona Vaccine will be free to all; Kerala CM Pinarayi Vijayan’s big announcement)

या राज्यांमध्ये मोफत लस

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याअगोदर भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये राज्यातील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता. यावेळी भाजपने बिहारी जनतेला मोफत कोरोना लसीचं आश्वासन दिलं होतं. बिहारनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील तामिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली होती. यामध्ये आता केरळ राज्याचाही समावेश होणार आहे. तामिळनाडूप्रमाणे आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी घोषणा केली होती की, राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे. तसेच तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंद्र यांनी घोषणा केली होती की, राज्यातील गरीब नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल.

देशात कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 8 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum) भेटी दिली होती. या भेटीनंतर त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविशील्ड ही लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे. कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळू शकते. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

‘सीरम’च्या लशीची किंमत बाजारपेठेत जास्त

‘सीरम’कडून आतापर्यंत S11 लशीचे 4 कोटी डोस तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या लशीला असणारी मागणी पाहता कोविशील्डच्या 20 कोटी डोसची निर्मिती करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचे ठरवले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोविशिल्डचे दोन डोस देणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या यादीतील 3 कोटी लोकांसाठी 6 कोटी डोसची गरज आहे. ही लस साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात बाजारपेठेत उपलब्ध होईल. खुल्या बाजारपेठेत या लशीची किंमत 500 ते 600 रुपये इतकी असेल.

लसी भरपूर, पण आधी कुठली लस येणार?

ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राजेनिका यांनी मिळून कोविशिल्ड ही लस बनवली. तिच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्या आहेत. मात्र, अ‍ॅस्ट्राजेनिकाने पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याचं ठरवल्याने या लसीला काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. या लसीचं उत्पादन पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट करत आहे.

दुसरीकडे, फायझर या अमेरिकन कंपनीची लसही 94 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली आहे. ही लस नागरिकांना देण्यासाठी ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये लवकरच ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे. याच धर्तीवर भारतातही लसीकरणाला परवानगी देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

लसीसाठी खिशाला किती कात्री बसणार?

01. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनिकाची कोविशिल्ड लस –

भारत ज्या लसीकडे मोठ्या आशेने पाहतोय, ती सीरमची लस अवघ्या 200 ते 250 रुपयांमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तर खासगी संस्थांना ही लस 1 हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र केंद्र सरकार यासाठी महालसीकरण मोहीम राबवत आहे. त्यामुळे ही लस फुकटात सर्वांना टोचली जाण्याची शक्यता आहे.

02. फायझरची कोरोना लस-

फायझर ही अमेरिकेची कंपनीही कोरोनाच्या लढाईत पुढे आली आहे. इंग्लंड सरकारने या कंपनीबरोबर लसीसाठी करारही केला आहे. शिवाय ब्रिटनमध्ये ही लस नागरिकांना दिली जाणार आहे. तिसऱ्या चाचणीत ही लस 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ब्रिटन सरकारने या लसीच्या वापराला परवानगी दिली. पुढच्या काही आठवड्यात ही लस ब्रिटनच्या नागरिकांना टोचलीही जाईल. तब्बल 3 हजार रुपयांना ही लस मिळण्याचा अंदाज आहे.

03. अमेरिकेची महागडी मॉर्डना लस

मॉडर्ना ही अमेरिकेची कंपनी कोरोनाची लस बनवली आहे. नावाप्रमाणेच ही लसही मॉर्डन आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 94.5 टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही लस 25 ते 30 डॉलर म्हणजेच तब्बल 1800 ते 2700 रुपयांच्या दरम्यान असू शकते. कोरोनाने ज्यांची तब्येत जास्त बिघडली आहे, त्यांच्यासाठी ही लस संजीवनी असेल, असा कंपनीचा दावा आहे. (Corona Vaccination Program soon to be finalized know A to Z information about price and date)

04. चिनीमधून सुरु झालेल्या कोरोनावर चीनची लस-

चिनी वस्तू घ्यायच्या नाहीत, असं आपण म्हणतो, पण पर्यायच नसेल आणि चिनी लस कोरोनावर प्रभावी असेल तर? म्हणूनच चिनी कंपन्यांचाही विचार करावा लागेल. सायोनोफार्म ही चिनी कंपनीही लस बनवत आहे, जी आता तिसऱ्या टप्प्यात आहे. पण चिनी वस्तू जशा स्वस्त असतात. तशी ही लस काही स्वस्तात मिळणार नाही. तुम्ही फ्रीज, टीव्ही किंवा इतर महागडं सामान घेण्याच्या बेतात असाल, तर तो विचार तुम्हाला बदलावा लागू शकतो. कारण याच किंमतीत ही लस मिळेल, या लसीची किंमत तब्बल 10 हजारांच्या घरात जाऊ शकते. आता 10 गुणिले तुमच्या घरातील माणसं मोजा, म्हणजे बजेट काय ते कळेल! पण असं असलं तरी भारतात अगदी मोफत लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला इतर कुठल्या कंपनीच्या लसीसाठी खिसा रिकामा करावा लागणार नाही.

संबंधित बातम्या

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!

कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती

(Corona Vaccine will be free to all; Kerala CM Pinarayi Vijayan’s big announcement)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI