वायरल वास्तव : कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन?

हा व्हिडीओ फेक आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हिडीओमध्ये एडीटिंग करुन पाकिस्तानातील एखाद्या शहरातील नावाऐवजी लॉस अँजेलसचं नाव टाकलं आहे का? असंही कोणी विचारत आहे. तर नाही! हा व्हिडीओ फेक नाही

वायरल वास्तव : कराचीहून लॉस अँजेलसला जाणारी ट्रेन?

मुंबई : पाकिस्तानहून थेट अमेरिकेला जाणाऱ्या ट्रेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल (Pakistan Los Angeles Train Viral Video) झाला आहे. अर्थात हे शक्यच नसल्याची कल्पना नेटिझन्सला असली, तरी नेमका हा प्रकार काय आहे? म्हणून अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. कारण ट्रेनवरील डिजिटल साईनबोर्डवर इस्लामाबाद किंवा लाहोर नाही, तर चक्क ‘लॉस अँजेलस’ लिहिलं आहे.

पाकिस्तानात सिंध प्रांतातील सुक्कूर शहरातील रोहरी रेल्वे स्थानकावरचा हा व्हिडीओ आहे. स्टेशनवर असलेल्या एका ट्रेनवर इलेक्ट्रिक साईनबोर्ड दिसत आहे. यामध्ये कराची ते लॉस अँजेलस असा रेल्वेमार्ग लिहिला आहे. आता पाकिस्तानची ही काय नवी भानगड? असा प्रश्न पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘पाकिस्तान रेल्वे लॉस अँजेलसला जात आहे. पाकिस्तान रेल्वेने खूप प्रगती केली आहे. हे प्रवासी व्हिसाशिवाय अमेरिकेला जात आहेत’ असं एक माणूस ओरडत असल्याचंही व्हिडीओमध्ये ऐकायला येतं. त्यामुळे साहजिकच हा प्रकार काय आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Pakistan Los Angeles Train Viral Video) हजारो जणांनी शेअर केला आहे. व्हिडीओचे व्ह्यूज लाखाच्या संख्येत गेले आहेत. भारतीय यूझर्सनी पुन्हा एकदा पाकिस्तानला यथेच्छ ट्रोल केलं आहे. नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला फुटलेले धुमारे तुम्हाला ट्विटर-फेसबुकवर पाहता येतील.

आता, हा व्हिडीओ फेक आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हिडीओमध्ये एडीटिंग करुन पाकिस्तानातील एखाद्या शहरातील नावाऐवजी लॉस अँजेलसचं नाव टाकलं आहे का? असंही कोणी विचारत आहे. तर नाही! हा व्हिडीओ फेक नाही, खरा आहे. ट्रेनच्या बोर्डवर लॉस अँजेलसच लिहिलं आहे. मात्र ही वस्तुस्थिती खोटी आहे.

खुद्द पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनीच या प्रकरणावर भाष्य केलं आहे. हा संगणकीय फलक (कॉम्प्युटराईज्ड डिस्प्ले) आहे. लोकं नाठाळ असतात. अशीच कोणीतरी खोडी केली आणि डिजिटल बोर्डशी छेडछाड करत मूळ शहराचं नाव बदललं आणि लॉस अँजेलस टाकलं, असा दावा अहमद यांनी केला आहे.

पाकिस्तानला दणका, निजामाची अब्जावधींची संपत्ती भारतात येणार

‘अल्लाहची इच्छा असेल, तर आमचं मंत्रालय लवकरच लॉस अँजेलसला एखादी ट्रेन नेईल’ अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे हा व्हिडीओ काय, आणि मंत्रीमहोदयांचं स्पष्टीकरण काय, मनोरंजन तर झालंच.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI