सुरक्षा भेदून, बॉडीगार्ड हटवून शेतकऱ्याच्या मुलीचा उद्धव ठाकरेंकडे हट्ट, माझ्या उंबऱ्याला पाय लावा…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी (15 नोव्हेंबर)सातारा-सांगली जिल्ह्यातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते (Uddhav Thackeray wet drought). यावेळी त्यांनी अनेक गावांना-शेतकऱ्यांना भेट दिली. यावेळी मात्र एक भेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत खास ठरली.

सुरक्षा भेदून, बॉडीगार्ड हटवून शेतकऱ्याच्या मुलीचा उद्धव ठाकरेंकडे हट्ट, माझ्या उंबऱ्याला पाय लावा...

सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी (15 नोव्हेंबर)सातारा-सांगली जिल्ह्यातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते (Uddhav Thackeray wet drought). यावेळी त्यांनी अनेक गावांना-शेतकऱ्यांना भेट दिली. यावेळी एक भेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत खास ठरली. उद्धव ठाकरेंनी काटेवाडी गावातील भानुदास कोरडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची  त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी या कुटुंबाचं शिवसेनेविषयीचं प्रेम पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले (Uddhav Thackeray visit Farmers Family).

काटेवाडी गावातील शेतीच्या नुकसानीच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे हे पुढील गावांमधील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी गाडीकडे निघाले. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी गर्दीला बाजूला करत त्यांना वाट करून दिली. मात्र, या गर्दीत एका मुलीचा उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला. ही मुलगी सगळ्या सुरक्षा रक्षकांना बाजूला करत पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. शिवसेना पक्षप्रमुखांनी तिच्या घरी दोन मिनिटे का होईना येण्याचा हट्ट तिने धरला होता. अखेर उद्धव ठाकरे यांना तिचा हट्ट पुरवावा लागला आणि ते थेट तिच्या घराकडे निघाले.

पुढे उद्धव ठाकरे आणि मागे त्यांचा सगळा लवाजमा. उद्धव ठाकरे चालत त्या मुलीच्या घरी पोहेचले. हे घर भानुदास कोरडे नावाच्या शेतकऱ्याचं होतं. भानुदास कोरडे हे शिवसैनिक आणि त्यांची मुलेही शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी. आपल्या घरात चक्क शिवसेनाप्रमुखांचा मुलगा उद्धव ठाकरे हे आल्याचं पाहून या कुटुंबातील अबालवृद्धांचे चेहरे उजळून निघाले. उद्धव ठाकरे यांनीही सर्व कुटुंबाला स्वतःसोबत उभं करून फोटो काढला. उद्धव ठाकरेंच्या विनम्रतेने हे कुटुंब भारावून गेलं, त्यांना अश्रू अनावर झाले. जेव्हा या कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरेंच्या पाया पडायला आले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं आणि मी एक सामान्य माणूस आहे कुणी देव नाही, असं ते म्हणाले.

हेही वाचा : ‘सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या’, शेतकऱ्याची मागणी, उद्धव म्हणाले पत्ता द्या, स्टेजवर जागा देतो!

उद्धव ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा

सध्या अनेक राजकीय नेते राज्यातल्या पीक नुकसानीची पाहणी करण्याकरिता शेतकऱ्याच्या बांधावर पोहचत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही सातारा-सांगली जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना भेटून आपल्या नुकसानीविषयीची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनीही काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान, त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. रस्त्यात येणाऱ्या गावांनाही त्यांनी भेट दिली, आपला ताफा थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली, त्यांची निवेदनं स्वीकारली. सांगली जिल्ह्यातून ते सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये या नुकसानीची पाहणी करताना खटाव तालुक्यातील काटेवाडी गावात सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता थेट शेतात पोहचले. नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI