आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात, नांदेड विमानतळाकडे जात असतानाची घटना
मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा आज भीषण अपघात झाला. संबंधित अपघाताची घटना नांदेड शहरालगत घडली. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेचं गांभीर्य ओळखून प्रशासन तातडीने कामाला लागलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात गाडी डिव्हायडरच्या खड्ड्यामध्ये उतरली. या गाडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. आदिती तटकरे यांचा ताफा भोकरचा कार्यक्रम आटोपून नांदेड विमानतळाकडे येत होता. या दरम्यान नांदेड शहरालगत आसना बायपास परिसरात आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात फॉर्च्यूनर गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे याच्या उपस्थित नांदेडच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आदिती तटकरे नांदेड विमानतळाकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली.
आदिती तटकरे लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाल्या?
दरम्यान, आदिती तटकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. “लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 16 किंवा 17 ऑगस्टला मिळेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1 कोटी 40 लाख अर्ज आमच्याकडे आले आहेत. यापैकी 1 कोटी 25 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. याचा आनंद महिलांना आहे, म्हणूनच पहिल्या दिवसापासून विरोधकांना ते खटकतं आहे. माता भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद बघवत नाही म्हणून विरोधक टीका करतात”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी आजच्या कार्यक्रमात दिली.
