भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली, एका रात्रीत..; डोंबिवलीच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा आरोप, अखेर राज ठाकरेंनी न्याय दिला
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी मिळण्यावरून अनेकांमध्ये नाराजी होती. अशाच एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. डोंबिवली पश्चिम इथल्या धात्रक कुटुंबासोबत भाजपने गद्दारी केली, असं तिने म्हटलंय.

राज्यभरात सध्या महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण भाजपचे रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तरी ठाकरे बंधूंच्या युतीला विरोध असल्याकारणाने कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सामंजस्यपणे युती केली. परंतु उमेदवारीवरून काही ठिकाणी वादसुद्धा झाले. डोंबिवली पश्चिम इथं भाजपचे शैलेश धात्रक आणि त्यांच्या पत्नी मनिषा धात्रक यांना उमेदवारी मिळण्याची खात्री होती. तसं त्यांना सांगण्यातही आलं होतं. परंतु अचानक काँग्रेसमधून आलेल्या काही नेत्यांना त्याठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर धात्रक कुटुंबात प्रचंड नाराजी निर्माण झाली. ही नाराजी त्यांची मुलगी आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर पूजा धात्रकने सोशल मीडियाद्वारे बोलून दाखवली.
काय म्हणाली पूजा?
“गेली 20 वर्षे माझ्या आईवडिलांनी फक्त एकाच पक्षाला दिली, तो म्हणजे भाजप. वीस वर्षे ते नगरसेवकाच्या पदावर होते.. लोकांसाठी आणि वॉर्डसाठी. त्यांना अनेकदा खोटी आश्वासनं देण्यात आली की, तुम्हाला हे पद देऊ, ते पद देऊ. पण कधी काहीच झालं नाही. माझ्या आईवडिलांनी पक्षासोबत कधीच गद्दारी केली नाही. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 28 डिसेंबरला त्यांना फोन आला की, तुम्हा दोघांना तिकिटं मिळणार आहेत, त्यामुळे एबी फॉर्म भरायची तयारी करा. 29 डिसेंबरला आमच्याकडून सर्व तयारी झाली होती आणि दिवसभर आम्ही प्रतीक्षा करत होतो. रात्री उशिरा 12 वाजताच्या सुमारास आम्हाला समजलं की आम्हाला तिकिटच मिळणार नाही,” असा खुलासा तिने केला.
View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “आमचं काम असतानाही त्यांनी आमच्यासोबत असं का केलं? कारण त्यांना नवीन लोकांना खुश करायचं होतं. त्यांनी त्या पॅनलमधून तीन नवीन लोकांना तिकिट दिलं, जे काँग्रेस आणि इतर पक्षातून आले होते. डोंबिवलीच्या आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता. पण आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नव्हतो. अखेर 30 डिसेंबर रोजी आईवडिलांसोबत मीसुद्धा एबी फॉर्म भरून आले, मनसेकडून. आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकलो असतो, असा प्रश्न तुम्ही विचाराल. तर नाही, कारण हे पॅनल सिस्टिम आहे. भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली.”
आता पूजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे. तुझ्यात खूप हिंमत आहे, असं एकाने लिहिलं. तर ‘एवढं स्पष्ट बोलण्याची हिंमत तेच ठेवतात जे खरे असतात आणि तुम्हाला सर्वांनी नक्कीच पाठिंबा द्यायला हवा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असं म्हणत नेटकऱ्यांनी पूजाची साथ दिली आहे.
