मतांसाठीच हिंदू-मराठी राजकारण, नाना पटोलेंचा दावा
महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. हिंदू, मराठी राजकारण हा त्याचाच एक भाग आहे. मराठी आणि हिंदू मतांसाठीच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, मनसे आणि इतर पक्षांचे नेतेही प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपकडून लोकांचे मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू आहे असं पटोले यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपवाले मानसिक आजारी आहेत
भाजपवर टीका करताना पटोले म्हणाले की, ‘भाजपवाले मानसिक आजारी आहेत, सत्तेचा माज आहे. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठा रोष आहे, याचा उद्रेक होईल. लोकांचे मत घेण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी या विषयांवर राजकारण सुरू आहे.कुणाला जर याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतील तर ते शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत असं पटोले यांनी म्हटले आहे.’
…म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत
निवडणूक आयोग आणि भाजपच्या प्रचारावर बोलताना पटोले म्हणाले की, निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. सरकार प्रचारात व्यस्त, जनता वाऱ्यावर आहे, म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. नेतेमंडळी हेलिकॉप्टरने फिरत आहेत. 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, तरीही मी मोकळा आहे, अजित पवारांचे हे वक्तव्य सूचक आहे असंही पटोले म्हणाले.
राहुल नार्वेकर यांना भाजपने पदावरून हटवावे
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचे समोर आले होते. यावर बोलताना पटोले म्हणाले की, विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. राजकारणी म्हणून त्यांना वावरता येत नाही, त्यामुळे भाजपचे त्यांना बदलावे. नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना पटोले यांनी जेष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं विधान केले आहे.
