प्रियाला पाडायचं… भाई आणि मॅडमचा एक मेसेज अन् सरवणकरांचा घात; खळबळजनक पुरावे समोर
दादर-माहिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर राजकीय भूकंप झाला आहे. भाजपच्या एका गटाने युतीधर्म न पाळता गद्दारी केल्याचा आरोप कुणाल वाडेकर यांनी पुराव्यांसह केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) निकालाने दादर-माहिम परिसरात महायुतीत राजकीय भूकंप घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना प्रभाग क्रमांक १९४ मध्ये पराभवाचा धक्का बसला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीधर्म पाळला नाही, उलट जाणीवपूर्वक आमचा पराभव केला, असा खळबळजनक आरोप समाधान सरवणकर यांनी पुराव्यासह केला आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच शिवसेना विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका विशिष्ट गटावर गद्दारीचे गंभीर आरोप केले आहेत. भाजपमधील एका टोळीने युतीधर्म धाब्यावर बसवून शिवसेनेच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांच्या विरोधात काम केले, असा दावा वाडेकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी काही खळबळजनक व्हॉट्सअप चॅट्सही फेसबुकवर पोस्ट केले आहे.
नेमका आरोप काय?
कुणाल वाडेकर यांनी त्यांच्या फेसबुकवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एक व्हॉट्सअॅप चॅट दिसत आहे. या चॅटमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
- मॅडम: मनोज कुठे आहे?
- कार्यकर्ता: काय झालं मॅडम?
- मॅडम: भाईसोबत बोलणं झालं आहे.
- कार्यकर्ता: ओके मॅडम.
- मॅडम: तिथूनही मिळालं आहे, प्रियाला पाडायचं आहे, सर्वांना सांगायला सुरुवात करा.
- कार्यकर्ता: टेन्शन नका घेऊ.
- मॅडम: पुढच्या वेळी तुम्हाला जिंकवू.
- मॅडम: विविकेला काही सांगू नका, जे कोणी आपले आहेत त्यांना सांगा.
- कार्यकर्ता: ठीक आहे त्यांना सांगत नाही.
- मॅडम: जानीला तुझ्याकडे पाठवते, लगेच काम चालू करा.
ही चॅट व्हायरल झाल्यानंतर आता दादरमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे दादरमध्ये भाजपच्या एका गटाने पडद्यामागून शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध मोहीम राबवली, असा दावा कुणाल वाडेकर यांनी केला आहे.
सरवणकर कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी काम केले
आम्ही युतीधर्म प्रामाणिकपणे पाळला. प्रभागात १९० मध्ये भाजपच्या उमेदवार शीतल गंभीर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. मग आमच्या हक्काची १९१ ची जागा कशी पडली? भाजपमध्ये एक अशी टोळी तयार झाली आहे जी केवळ सरवणकर कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी काम करत आहे, असा आरोप कुणाल वाडेकर यांनी केला.
आज दादर-माहिम मतदार संघामध्ये भाजपच्या काही टोळीतल्या लोकांनी शिवसेनेच्या उमेदवारांची काम केली नाही, त्यामुळे ते पराभूत झाले आहेत. सर्व भाजपचे पदाधिकारी वाईट आहेत असा मी अजिबात बोलत नाही. पण काही टोळकी निर्माण झाली आहे. जे सरवणकर घराच्या विरोधात काम करत आहेत. ही गोष्ट मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे, असेही कुणाल वाडेकर यांनी सांगितले.
माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्सच्या स्वरूपात भक्कम पुरावे
या विरोधात मी फेसबुक पोस्ट केली आहे. व्हॉट्सअप वर कार्यकर्त्यांना सांगितल की प्रिया सरवणकर यांचं काम करू नका, माझ्याकडे पुरावे आले आहेत, त्यामुळे मी पोस्ट केली आहे. त्यांच्याकडून आता तक्रार करणार म्हणून असे सांगण्यात येत आहे. माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्सच्या स्वरूपात भक्कम पुरावे आहेत. जे लोक आता आमच्यावर उलट आरोप करत आहेत, त्यांनी खुशाल तक्रार करावी. आम्ही तपासात सर्वांचे कॉल डिटेल्स काढण्याची मागणी करणार आहोत, असे कुणाल वाडेकर यांनी म्हटले.
जे कोणी आता आमच्यावर पोस्ट करून आरोप करत आहेत, त्यांनी आमच्या विरोधात तक्रार करु दे. आमच्याकडे देखील पुरावे आहेत ते आम्ही दाखवू. माहीममध्ये भाजप परिवार चे स्थानिक जुने निष्ठावंत पदाधिकारी यांनी खरंच खूप चांगले काम केले व महायुती सोबत शेवट पर्यंत होते. परंतु या चॅट मध्ये उल्लेख केलेले टोळी चा भाई कोण आणि कोणत्या मॅडम भाई चा आदेश पाळत आहेत? असा सवाल कुणाल वाडेकर यांनी केला आहे.
