शरद पवार यांच्या वाढदिवसालाच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं? काय आहे आतली बातमी?
NCP : अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. अलिकडेच पार पडलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांशी युती केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांच्या विलीनिकरणाची चर्चा सुरु झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून याबाबत संकेतही देण्यात आले होते. अशातच आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
शरद पवार यांच्या वाढदिवसाला दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, पण…
संजीव उन्हाळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणावर बोलताना म्हटले की, ‘अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र दुःखी आहे, त्यापेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दुःखात आहेत. यातच दोन्ही पक्षाचे विलीनीकरण व्हावं हा मुद्दा जोरकसपणे मांडला जात आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, परंतु कुठे तरी माशी शिंकली आणि हे लांबणीवर पडलं. आता प्रश्न असा आहे की अजित दादाच्या अनुपस्थितीत हे सर्व घडत आहे आणि हे क्लेशकारक आहे.
शरद पवार एनडीएसोबत जाणार?
पुढे बोलताना उन्हाळे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि सध्या तशी परिस्थिती आहे, परंतु यामध्ये दोन तीन गोष्टींचा उहापोह करणे महत्त्वाचे आहेय एक म्हणजे या प्रकरणातून अजित पवारांना काय त्रास झाला. हे सुनेत्रा पवार यांना माहित आहे आणि त्यांनी ते अनुभवलेला आहे. सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात हे जेवढं महत्त्वाचं आहे. तसेच शरद पवार काय निर्णय घेतात हाही महत्त्वाचा निर्णय आहे. निर्णय केवळ दोन पक्ष एकत्र येण्याचा नाही, तर एनडीए बरोबर जायचं की नाही हा निर्णय ही शरद पवार यांना घ्यावा लागेल. या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांचे एकीकरण तेव्हाच होईल जेव्हा एनडीए बरोबर जाण्यासाठी शरद पवार आणि सर्वांची तयारी असेल.
पुढे बोलताना संजीव उन्हाळे म्हणाले की, ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे चांगलेच घडेल, कारण जयंत पाटील सारखा नेता सत्तेत येईल आणि अर्थमंत्री पदाचा प्रश्न मिटेल. सुप्रिया सुळे यांच्यासारखा डायनॅमिक नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर संधी मिळेलय माझ्या मते एकीकरणाचा विषय आठ पंधरा दिवसानंतर घेतला जाईल. यावेळी शरद पवार निवृत्त होतील, असे कोणी म्हणत असेल ते कधीही घडणार नाही. कारण शरद पवार हे अतिशय क्रियाशील आणि सतत कामात राहणारे व्यक्तित्व आहे आणि शरद पवार यांची या वयातही काम करण्याची तयारी आहे.
शरद पवार यांचा एनडीएमध्ये जाण्याचा जो विरोध होता तो या परिस्थितीमध्ये मावळू शकतो आणि त्यांनी एनडीएमध्ये जाण्याची परवानगी दिली तरच ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे युती घडेल, हीच अडचण आहे. ही अडचण दूर झाली की लगेच दोन्ही पक्ष एकत्र येतील. अजित पवारांची तशी इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा अंकुश काकडे यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यापेक्षाही शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार यांच्याकडेही इच्छा बोलून दाखवली होती.’
अजित दादांनी काका सोबत असावेत असं नेहमी वाटायचं
आपण आपल्या काका पासून दूर राहू नये अशी अजितदादांची इच्छा तीव्र होती. राजकारणासाठी शरद पवार यांचा सल्ला महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले होते. अजित दादांना नेहमी वाटायची की, शरद पवार आपल्या सोबत असावेत. सध्याची राजकीय परिस्थिती बघता दोन्ही पक्ष एकत्र येतील ही ठरलेली गोष्ट आहे. परंतु शरद पवार यांचा जो एनडीए ला विरोध आहे, तो मावळून, ते कसा हिरवा कंदील दाखवतात आता एवढेच बाकी आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील – संजीव उन्हाळे
अजित दादा यांचा जो वारसा आहे, हा वारसा ऑफिसिअली सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे लोक दुसरा उपमुख्यमंत्री सहन करू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या घरातील कोणीतरी उपमुख्यमंत्री पाहिजे. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हे सर्व लक्षात घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाईल. पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेण्यासाठी या परिस्थितीमध्ये कदाचित त्या संकोच करत असतील. परंतु सगळे राष्ट्रवादीचे नेते मिळून त्यांना मनवतील. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील असे सध्याचे चित्र आहे.
