मोठी बातमी! स्टेजवरच महायुतीत मोठा बेबनाव, शिंदेंचा थेट इशारा, तर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं पहायला मिळत आहे, आता मोठी बातमी समोर आली असून, थेट स्टेजवरच महायुतीमध्ये बेबनाव पहायला मिळाला, यावेळी एकनाथ शिंदे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विशेष: शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सर्व काही अलबेल नसल्याचं पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील बहिष्कार घालण्यात आला होता. कल्याण -डोंबिवलीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटातील अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला, त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली. दरम्यान त्यानंतर शनिवारी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकाच स्टेजवर आल्याचं पहायला मिळालं. डोंबिवलीमध्ये झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे एकाच स्टेजवर आल्याचं पहायला मिळालं. मात्र इथे देखील महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा पहायला मिळाला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. एवढे सभा आणि कार्यक्रम मी बघतो. प्रत्येक सभेमध्ये मला लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या दिसते. विकासाची दृष्टी आपण ठेवली होती. रवींद्र चव्हाण त्यावेळी मंत्री होते, आम्ही त्यावेळी काहीही बघितलं नाही. विकासासाठी मागितला तो निधी आम्ही तात्काळ दिला. या हाताने दिलेलं मी कधी त्या हातालाही कळू दिलं नाही, हा एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. मला खड्ड्यात टाकणारे खड्ड्यात गेले आहेत, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांना लगावला.
तर दुसरीकडे आपल्या भाषणामध्ये डोंबिवलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिल्याचा उल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. कल्याण डोंबिवलीकरता निधी कसा मिळेल असा प्रयत्न आमच्या सर्वांचा असतो. एमएमआरडीएचा निधी आम्हाला मिळत नव्हता. पण 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे तो मिळू लागला. हे निधीचे पाऊल त्या काळापासून उचलले गेले. पंतप्रधानांचे कौतुक करावे तेवढे थोडे, असं यावेळी रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांनी स्टेजवरच उत्तर दिलं आहे. त्यांनी डोबिंवलीमधील कामांचं श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. कल्याण डोंबिवलीत 300 कोटी रुपयांचे रस्ते झाले आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कल्याण डोंबवलीत निधी यायला लागला, उदय सामंतानी देखील मोठा निधी दिला आहे, असं यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये श्रेयवादावरून लढाई रंगल्याचं पहायला मिळालं.
