डोंबिवलीत भर दुपारी पळापळ… दोन बड्या कंपन्या धडाधडा पेटल्या, धुरामुळे अनेकांना त्रास; कामगारांचं काय झालं?
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे. विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी आग लागली असून, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. काही कर्मचारी अडकले असल्याची भीती आहे.

डोंबिवली एमआयडीसी (MIDC) परिसरातील भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या दोन कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. एमआयडी परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर ती आग एरोसेल कंपनीपर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
एमआयडीसी परिसरात धावपळ
MIDC मधील एका कापड प्रक्रिया कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी मोठी आहे की कंपनीतील सर्व सामग्री जळून खाक झाली आहे. सुरुवातीला ही आग ट्रान्सफॉर्मरला लागली होती. त्यानतंर ही आग कंपनीत पसरली. यामुळे कर्मचारी आणि एमआयडीसी परिसरात एकच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा पाण्याचे टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासोबतच एमआयडीसी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात मदत करत आहेत.
काही कर्मचारी अडकले
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणाही तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. आग लागलेल्या कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली आणि तिचे कारण काय, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
