इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला, गजानन मेहेंदळे यांचे निधन
प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासावर विपुल संशोधन केले आणि अनेक ग्रंथ लिहिले

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक असलेले गजानन भास्कर मेहेंदळे यांचं बुधवारी (१७ सप्टेंबर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी समर्पित केले होते. ते अविवाहित होते. सध्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतिहास संशोधनाला जीवन वाहून घेतलं
गजानन मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला होता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांच्यासारख्या दिग्गजांच्या परंपरेला त्यांनी पुढे नेलं. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी इतिहास संशोधनाला आपलं जीवन वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते मोठे अभ्यासक होते. इतिहासाचा अभ्यास करताना ते फक्त एकाच भाषेत रमले नाहीत. त्यांना फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषा येत होत्या. त्यामुळे त्यांनी मूळ ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास केला. विशेषतः मोडी लिपी आणि फारसी दस्तऐवजांवर त्यांचं प्रभुत्व होतं.
मेहेंदळे यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सखोल संशोधन केलं. त्यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. जे आज जगभरातील इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ मानले जातात. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आरमारावरही ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हा विशेष ग्रंथ लिहिला. त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांमध्ये ‘श्री राजा शिवछत्रपती’ (खंड १ आणि २), ‘Shivaji: His Life & Times’, ‘शिवाजी झाला नसता तर’ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘टिपू ॲज ही रिअली वॉज’ आणि ‘मराठ्यांचे आरमार’ हे त्यांचे इतर प्रसिद्ध ग्रंथ आहेत.
मेहेंदळे फक्त भूतकाळाचाच अभ्यास करत नव्हते. ते वर्तमानाशीही जोडलेले होते. मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर असल्याने त्यांना युद्धनीतीचं सखोल ज्ञान होतं. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते युद्ध पत्रकार म्हणून हजर होते. त्यांच्या निधनाच्या वेळी ते दुसऱ्या महायुद्धावर एका मोठ्या ग्रंथाचं काम करत होते. त्याची जवळपास ५ हजार पानं लिहून तयार झाली होती.
इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी
१९६९ मध्ये त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास सुरू केला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि भारत इतिहास संशोधक मंडळ यांसारख्या अनेक संस्थांशी त्यांचं जवळचं नातं होतं.
