‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी?’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न

दारुबंदी अपयशी आहे की मंत्री असा थेट सवाल करत दारुमुक्ती संघटनेने विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न विचारले आहेत.

‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी?’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न

गडचिरोली : राज्याच्या अतिदुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यात सध्यता दारुबंदीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आदिवासींनी उभ्या केलेल्या लोकलढ्यातून मागील 27 वर्षांपासून लागू असलेली दारुबंदी उठवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम मागणी केली. त्यानंतर आता यासाठी समिती स्थापन करण्याचेही प्रयत्न सुरु केले आहेत. याविरोधोत गडचिरोली जिल्हा दारुमुक्ती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच दारुबंदी अपयशी आहे की मंत्री असा थेट सवाल केला आहे. याशिवाय दारुमुक्ती संघटनेने विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न विचारले आहेत (Gadchiroli Darumukti Sanghatana ask Five questions to Minister Vijay Wadettiwar on Alcohol Ban).

दारुमुक्ती संघटनेने मंत्री विजय वडेट्टीवारांना विचारलेले 5 प्रश्न खालीलप्रमाणे;

दारुमुक्ती संघटनेचा विजय वडेट्टीवारांना पहिला प्रश्न

“आपण म्हणता की गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी अयशस्वी झाली, बेकायदेशीर दारु प्रचंड वाढली, विषारी दारु पिऊन खूप माणसे मरत आहेत. तसे जर खरेच झाले असेल तर ही जबाबदारी कुणाची? ‘दारुबंदी’ हा शासकीय कायदा आहे, 1992 मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत असताना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. त्याच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी शासनाची, म्हणजे पर्यायाने मंत्री म्हणून तुमची आहे. दारुबंदी अयशस्वी झाल्याची जी वर्णनं तुम्ही करता ती जर खरी असतील, तर ते मंत्री म्हणून तुमच्याच अपयशाचे वर्णन आहे. त्यामुळे या मुद्द्यावर दोन उपप्रश्न उपस्थित होतात.”

“चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि आता-आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शासकीय दारुबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? जर शासकीय निर्णय तुम्हाला नीट अंमलबजावणी करता येत नसेल तर तुम्ही स्वत:ला ‘अपयशी मंत्री’ घोषित कराल का? दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी?”

दारुमुक्ती संघटनेचा विजय वडेट्टीवारांना दुसरा प्रश्न

“तुम्ही राज्याचे आपत्ति-सहायता मंत्री आहात. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाची प्रचंड मोठी आपत्ती आली आहे. गावो-गावी हजारो माणसे आजारी पडत आहेत. या भयंकर आपत्तीच्या निवारणाऐवजी तुम्हाला अचानक दारुबंदी हीच सर्वात मोठी आपत्ती का वाटते? कोरोना निवारणाऐवजी दारुबंदी उठवण्यातच तुम्हाला एवढा रस का आहे? यात कोणते रहस्य लपले आहे?

दारुमुक्ती संघटनेचा विजय वडेट्टीवारांना तिसरा प्रश्न

‘दारुबंदीची अंमलबजावणी अयशस्वी झाली’ हे दारुबंदी उठवण्याचे समर्थन होऊ शकते का? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे जाळे पसरले आहे. हे टीव्हीवर रोज जाहीर होते आहे. महाराष्ट्रात ड्रग्जविरोधी कठोर कायदा आहेत. तसे असूनही मुंबईत ड्रग्ज वाढले आहेत. तर त्याच न्यायाने ‘ड्रग्ज बंदी अपयशी झाली, तिला उठवा’ अशी मागणी तुम्ही केव्हा करणार आहात?

दारुमुक्ती संघटनेचा विजय वडेट्टीवारांना चौथा प्रश्न

भारतात आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचार विरोधी आणि बलात्कार विरोधी कायदे आहेत. तरी दिल्लीत ‘निर्भयाकांड’ झाले. उत्तरप्रदेशमध्ये हाथरस-कांड झाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्याविरुध्द सत्याग्रह करत आहेत. काँग्रेस पक्ष जागोजागी निदर्शने करतो आहे. आमच्या दृष्टीने बलात्काराचा निषेध झाला पाहिजे. पण दारुबंदी अयशस्वी झाली म्हणून तिला उठवा या ‘वडेट्टीवार न्याया’ने ‘बलात्कार बंदी उठवा’ अशी मागणी कराल का? बंदी असूनही देशात बलात्कार रोज घडतात. तर मग बलात्कार पूर्णपणे थांबवता येत नसतील तर बलात्कार कायदेशीर कराल का? आणि तोच न्याय लावून अपुरी अंमलबजावणी असलेली प्लास्टिकबंदी, भ्रष्ट्राचारबंदी हे सर्व केव्हा उठवणार? हे करणार नसाल तर मग फक्त दारुबंदी का उठवा?

दारुमुक्ती संघटनेचा विजय वडेट्टीवारांना पाचवा प्रश्न

“राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आर. आर. पाटील यांना गुटख्यामुळे तोंडाचा कॅन्सर झाला. त्यामुळे जागे होऊन राज्यात गुटखा-बंदी आणि सर्व प्रकारची सुगंधित तंबाखूबंदी लागू आहे. ती योग्यच आहे. पण तरी महाराष्ट्रात सर्वत्र रस्त्यांवर, चौकांमध्ये पानठेल्यांवर खुले आम खर्रा, मावा, सुगंधित तंबाखू विकली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा सर्वेक्षणानुसार अवैध दारुपेक्षा पाच पट अधिक अवैध तंबाखू विकली जात आहे. पुरुष, स्त्रिया, मुले खात आहेत. सुगंधित तंबाखूबंदीची अंमलबजावणी पूर्णत: अयशस्वी दिसते. गुटखा-खर्रा-सुगंधित तंबाखूबंदी उठविण्यासाठी समिती स्थापन का करत नाही? मंत्री महोदय, केवळ दारुच पुन्हा सुरु करण्यात तुम्हाला एवढा रस का?”

संबंधित बातम्या :

गडचिरोलीतील दारुबंदीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा एल्गार, ‘दारुमुक्ती संघटने’ची घोषणा

BLOG: जीएसटी, गुटखा-खर्राबंदी, आरक्षण हवं की नको यासाठी समीक्षा समिती नेमणार का?

चंद्रपूरमध्ये दारुबंदीची समीक्षा की दारुची मार्केटींग मोहीम? : डॉ. अभय बंग

Gadchiroli Darumukti Sanghatana ask Five questions to Minister Vijay Wadettiwar on Alcohol Ban

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI