महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट सक्रीय, पोलिसांना सापडलं 50 कोटींचे घबाड
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात महामार्ग पोलिसांनी ४० ते ५० कोटी रुपयांचे ३९ किलो अँफेटामाईन ड्रग्ज जप्त केले आहे. दिल्लीहून बंगळुरू जाणाऱ्या कारमधून हे ड्रग्ज सापडले. आरोपी सराईत ड्रग्ज तस्कर असून, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत आहे. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या छापेमारीत ठिकठिकाणी लाखो, कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज मिळत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावातून सुमारे ४० ते ५० कोटी रुपये किमतीचे ३९ किलो ॲम्फेटामाईन (Amphetamine) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जळगावातील महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावातील महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ नाकाबंदी लावली होती. यावेळी दिल्लीहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एका ब्रेझा कारला महामार्ग पोलिसांनी बोढरे फाट्याजवळ तपासणीसाठी थांबवले. त्यावेळी कारची कसून तपासणी करण्यात आली आहे. यावेळी गाडीच्या विविध भागांमध्ये अत्यंत घातक असलेला ॲम्फेटामाईन हा अंमली पदार्थ लपवलेल्या आढळून आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत ४० ते ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कार चालकाला ताब्यात घेतले असून, वाहनही जप्त करण्यात आले आहे.
आरोपी सराईत ड्रग्ज तस्कर
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात यापूर्वीही एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हा आरोपी सराईत ड्रग्ज तस्कर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून या घटनेची माहिती दिली. या कारवाईमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता आमदार चव्हाण यांनी वर्तवली आहे. या मोठ्या ड्रग्ज जप्तीमुळे जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा अंदाज येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावणार
दरम्यान काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात सवाल केला होता. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असा सवाल परिणय फुके यांनी केला होता. राज्यात ठिकठिकाणी ड्रग आणि अमली पदार्थांची तस्करी होतेय. यावर शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ड्रग्सची तस्करी रोखण्यसााठी टास्क फोर्स केली होती त्याच काय झालं? असा सवाल फुके यांनी केला होता.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. ड्रग तस्करी संदर्भात मकोका लावत येईल का? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात आपण बदल करून ड्रग तस्करी करणाऱ्यावर मकोका लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती.
