Gulabrao Patil: मला सर्वांना I Love You करावं लागतं; गुलाबराव पाटील यांच्या मिश्किल वक्तव्यामागे गणित काय?
Gulabrao Patil Statements: सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचं महापालिका निवडणुकीत फाटलं आहे. युती झाली नाही. तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्षाचं सूत जुळणार की नाही याची चर्चा सुरू आहे. त्यातच शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

किशोर पाटील/प्रतिनिधी: राज्यातील महापालिका निवडणुकीत मुंबई वगळता राज्यात महायुतीतील दोन नैसर्गिक युतीचा दावा करणारे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात ठाकले आहेत. मोजक्याच ठिकाणी दोन्ही पक्षांची युती झाली. तर इतर ठिकाणी दोन्ही पक्षे आमने-सामने आहेत. त्यामुळे विरोधकांनी फिल्डिंग लावली आहे. त्यातच आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचं सूत जुळणार की नाही याची चर्चा सुरू आहे. त्यातच शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य (Gulabrao Patil Statements)केलं आहे.
मला सर्वांसोबत आय लव्ह यु करावं लागतं
पाचोरा येथे एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी मिश्कील वक्वव्य केलं.मला बोलता येत नाही मला प्रॉब्लेम आहे मी सरकारमध्ये आहे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं, माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं.किशोर पाटील यांना सूट आहे, म्हणून ते दंड थोपटत आहेत.किशोर पाटील पोलीसमध्ये होते.ते आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले असते. नशिबाने तेही आमदार झाले, असे म्हणताच हश्या पिकला.
धरणगाव ची सत्ता माझ्याकडे 25 वर्षांपासून होती ती गेली, ती येणार नाही असं नाही ती सत्ता माझ्याकडे परत येईल.निवड आल्यानंतर काही नगरसेवकांचे कठीण होतं, दोन मोबाईल चार माणसं आणि हवा असते. नगरसेवकांना हात जोडून सांगतो आलेल्याशी गोड बोला काम हो अथवा ना हो, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.
युतीची शक्यता धुसर असल्याचे संकेत
विरोधकांना काहीही बोलू नका असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटलांना दिला. आपण निवडून आलो आहे आपण आता सर्वांचे आहोत. विरोधक जरी आपल्याकडे आले त्यांना पाणी पाजा आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सर्व विरोध संपतात. आमदारकीची निवडणूक अजून खूप लांब आहे, पुढे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत.आणि किशोर पाटील तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये भाजपशी युती करणार नाही हे मला माहित आहे, असे मोठे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले. त्यामुळे जळगावमध्ये आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता धुसर असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी युती तोडत निवडणूक स्वतंत्र लढली होती. पाचोरा भडगाव या दोघेही ठिकाणी शिवसेनेचा थेट भाजपशी सामना होता, भाजपाला पराभूत करत दोघेही ठिकाणी शिवसेनेने सत्ता मिळवली आहे.यामुळे किशोर पाटील येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी युती करणार नाही असे संकेत गुलाबराव पाटलांनी दिले आहे.
तीस वर्षांपूर्वीचा खास किस्सा
यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील तीस वर्षांपूर्वीचा खास किस्सा सांगितला. नगरसेवक झाला की तो ऐकत नाही माझा कार्यक्रम तसाच झाला होता असे म्हणत त्यांनी हा किस्सा सांगितला. नगरसेवक निवडून देणाऱ्याला नंतर बघतही नाही परंतु जे डोक्यावर घेतात ते डोक्याच्या खाली पटकतात. मी 1996 धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसवला होता.पैसे नव्हते म्हणून मी नगरसेवकांना घेऊन झुरखेड्याला पळून गेलो होतो.पळून जाण्यासाठी आम्ही मोठे गाव बघितलं, तिथला आमचा कार्यकर्ता श्रीमंत होता.सोळा दिवस आम्ही नगरसेवकांना त्याच्या राजवाड्यात ठेवले होते, त्यानंतर आम्ही धरणगावचा नगराध्यक्ष बसवला. ज्या नेत्याचे नगरसेवक चांगले त्या नेत्याला शंभर टक्के शहरात मताधिक्य मिळतं. नगरसेवकांना हात जोडून विनंती आमदारकीला किशोर पाटलांना शहरातून 15 हजाराचे मताधिक्य कसे मिळेल यासाठी काम करा, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
