अधिकारी सुट्टीवर, निवडणूक रखडली, माजी महिला सरपंचाकडून थेट इशारा, नेमकं काय घडलं?
कल्याण तालुक्यातील गोवेली-रेवती ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच पूजा जाधव यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाामुळे आमरण उपोषण सुरू केले आहे. २०२१ मध्ये त्यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर त्यांचे पद रिक्त झाले, पण नियमानुसार ३० दिवसांच्या आत झालेल्या निवडणुकीच्या अभावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली-रेवती ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच पूजा जाधव यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. 2021 मध्ये त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेल्याने त्यांचे सरपंचपद रिक्त झाले होते. नियमानुसार, पद रिक्त झाल्यानंतर एका महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक होते. पण असे असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यातच गेल्या अनेक महिने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पूजा जाधव यांनी हे पाऊल उचलले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पूजा जाधव यांची 2021 मध्ये गोवेली-रेवतीच्या सरपंचपदी निवड झाली होती. मात्र, काही काळातच इतर सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा ठराव मान्य करून त्यांचे पद रिक्त केले. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, सरपंचपद रिक्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे. परंतु, 15 मे 2025 पासून हे पद रिक्त असूनही, प्रशासनाने अद्याप निवडणुका घेतलेल्या नाहीत.
यासंदर्भात माजी सरपंच पूजा जाधव यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. प्रशासन हेतुपुरस्सर निवडणुका टाळून माझ्यावर अन्याय करत आहे. तसेच, तीन अपत्य असलेल्या उपसरपंचावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही, याबद्दलही पूजा जाधव यांनी निषेध नोंदवला. पूजा जाधव यांनी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून निवडणुकीची मागणी केली, पण त्यांच्या पत्रांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
नायब तहसीलदारांनी दिले स्पष्टीकरण
या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रशासनाची बाजू मांडली. चव्हाण यांनी सांगितले की, “निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी असलेले ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे विलंब झाला आहे. 28 जुलै रोजी त्यांना या कामासाठी नेमण्यात आले होते. पण ते सुट्टीवर असल्याने प्रक्रिया रखडली.” असे सत्यजीत चव्हाण यांनी सांगितले. आता लवकरच निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच, उपसरपंचाच्या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती सत्यजीत चव्हाण यांनी दिली.
उपोषण सुरूच राहणार
प्रशासनाकडून आश्वासने मिळूनही पूजा जाधव यांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. “जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. माजी सरपंचांच्या लढ्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे.
