Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE : मलिक यांना महायुतीत घेण्यावरुन फडणवीस यांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

| Updated on: Dec 08, 2023 | 12:22 PM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 07 डिसेंबर... आजपासून विधिमंडळ अधिवेशन सुरु झालं आहे. अशात या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोड... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE : मलिक यांना महायुतीत घेण्यावरुन फडणवीस यांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या..

मुंबई | 07 डिसेंबर 2023 : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आजपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनातील सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा. या शिवाय राज्याच्या राजकारणातील सर्व अपडेट तुम्हाला इथे वाचायला मिळेल. या शिवाय क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा लाईव्ह ब्सॉग फॉलो करयला विसरू नका. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Dec 2023 07:16 AM (IST)

    Maharashtra Assembly Winter Session | विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक

    विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख उपस्थित होते. विधिमंडळात सरकारला घेरण्यासाठी आणि अकरा तारखेला काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा तर 12 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

  • 08 Dec 2023 07:15 AM (IST)

    Maharashtra Assembly Winter Session | विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक

    विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख उपस्थित होते. विधिमंडळात सरकारला घेरण्यासाठी आणि अकरा तारखेला काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा तर 12 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

  • 07 Dec 2023 08:35 PM (IST)

    नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासाठी निधी मंजूर – फडणवीस

    नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र येथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम आणि 615 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून 575.79 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. – देवेद्र फडणवीस

  • 07 Dec 2023 08:29 PM (IST)

    नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून गुंतवणूक मान्यता – फडणवीस

    मुंबई : 3591.46 कोटी रुपयांच्या नीरा देवधर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) प्रदान केली आहे. यामुळे या प्रकल्पाला गती येणार आहे. भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस आदी भागांना याचा मोठा लाभ होईल. याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावतजी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांचेही अभिनंदन ! – देवेंद्र फडणवीस

  • 07 Dec 2023 07:33 PM (IST)

    Supriya Sule | फडणवीस यांचा मलिकांना विरोध, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

    मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या रांगेत बसले. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे मलिक यांना महायुतीत घेण्यावरुन विरोध दर्शवला. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    “नवाब मलिक हे फक्त राष्ट्रवादी नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजपच्या विरोधात ते ताकदीने लढले आहेत. आमच्या कडून नवाब मलिकांचा सन्मान होईल. माझ्यासाठी आमच्या कुटुंबातील भाऊ आहेत. त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल असेल तर दुर्दैवी आहे. महाराष्ट्रच राजकारण खालच्या पातळीवर गेल आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

  • 07 Dec 2023 07:07 PM (IST)

    नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत मतभेद?

    नागपूर | हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यावरुन आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी पत्र लिहून अजित पवार यांना पत्राद्वारे महायुतीत घेण्यावरुन विरोध दर्शवला आहे. फडणवीस यांनी त्याबाबत पत्र लिहिलं आहे. फडणवीस यांनी हे पत्र सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे.

  • 07 Dec 2023 06:52 PM (IST)

    सिंधिया यांनी नड्डा यांच्याकडे मागितली वेळ, संध्याकाळी होणार भेट!

    केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. दोघेही संध्याकाळी 7 नंतर भेटू शकतात.

  • 07 Dec 2023 06:37 PM (IST)

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून चेन्नईतील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चेन्नई आणि आसपासच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचीही त्यांनी बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

  • 07 Dec 2023 06:22 PM (IST)

    उद्या लोकसभेत सर्व खासदारांनी हजर राहावे, भाजपने जारी केला व्हीप

    भाजपने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी एक ओळीचा व्हीप जारी केला आहे. कारण काही अत्यंत महत्त्वाच्या कायदेविषयक कामकाजावर चर्चा होणार आहे.

  • 07 Dec 2023 06:05 PM (IST)

    सीएम योगी आदित्यनाथ पीएम मोदींना भेटण्यासाठी पीएमओमध्ये दाखल

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींना अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतील. तसेच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत पंतप्रधानांना माहिती देणार आहेत. यासोबतच लोकसभा निवडणुकीची तयारी आणि मंत्रिमंडळासह अन्य राजकीय विषयांवरही चर्चा होऊ शकते.

  • 07 Dec 2023 05:55 PM (IST)

    राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी

    नागपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पोहोचले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुख यांच्यासोबत ही बैठक सुरु आहे. विधिमंडळात सरकारला घेरण्यासाठी आणि 11 तारखेला काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा तर 12 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा समारोप या पार्श्वभूमीवर या नेत्यांची बैठक सुरू आहे.

  • 07 Dec 2023 05:50 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील, बाळासाहेब थोरात यांची टीका

    नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे याचा प्रत्यय सभागृहात आला. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र, सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

  • 07 Dec 2023 05:45 PM (IST)

    शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

    नागपूर : शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आम्ही शेतकऱ्यांच्या नेहमी सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मोठं नुकसान झालं आहे. सायक्लोनमुळे पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. या अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • 07 Dec 2023 05:35 PM (IST)

    मध्य रेल्वेच्या नव्या महाव्यवस्थापकांची अचानक तपासणी

    ठाणे : मध्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी कोणालाही कळू न देता लोकल गर्दीतून प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवासाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी ठाणे स्थानकांतील स्टेशन मास्तर आणि आरपीएफ पोलीस ठाण्याची पाहणी केली. अचानक ऑपरेशन नियंत्रण कार्यालयात महाव्यवस्थापक आल्याने रेल्वे अधिकारी वर्गात खळबळ उडाली, या पाहणीदरम्यान त्यांनी स्टेशन आणि टॉयलेट ब्लॉकची तपासणी केली.

  • 07 Dec 2023 05:25 PM (IST)

    माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला तक्रारीचा वाढदिवस साजरा

    जळगाव : महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या व्यापारी संकुलातील अनधिकृत बेसमेंटवर कारवाई करण्यासाठी 2020 ला निवेदन दिले होते. मात्र, तीन वर्ष उलटूनही या अनधिकृत बेसमेंटवर कुठलीही कारवाई मनपा प्रशासनाने केली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रारीचा वाढदिवस साजरा करत अनोखे आंदोलन केले. केकवर ‘निर्लजतेचा तिसरा वाढदिवस, लज्जाहीन भ्रष्ट मनपा कर्मचारी’ असा आशय लिहून अनोख्या पद्धतीचे हे आंदोलन केले.

  • 07 Dec 2023 05:20 PM (IST)

    नवी मुंबईत ८ अल्पवयीन मुले बेपत्ता, माजी खासदार संजीव नाईक यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

    नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ८ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संवेदनशील विषयासंदर्भात माजी आमदार संदीप नाईक आणि माजी भाजप खासदार संजीव नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. नागरिकांनी घाबरू नये किंवा तणावात येऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी यावेळी केले.

  • 07 Dec 2023 05:13 PM (IST)

    शंभर टक्के मी मंत्री बनणार, भरत गोगावले यांचा दावा

    मुंबई : आज सुनावणी आहे सुनावणीमध्ये आमचा शंभर टक्के विजय होईल असा मला विश्वास आहे. आदित्य ठाकरे यांची चौकशी होत असेल तर त्यातून सत्य समोर येईल. त्यांना घाबरण्याची काही गरज नाही. शंभर टक्के मी मंत्री बनणार असा दावा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला.

  • 07 Dec 2023 05:09 PM (IST)

    तर मातोश्रीवरचे सरडे आत्महत्या करतील, चित्रा वाघ यांची टीका

    मुंबई : तुमच्याबाबतीत कित्येक सरडे दररोज आत्महत्या करताहेत. बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल करणे. आदित्य, उद्धव याच्यावर टीका केली होती. ती विसरला की काय? मातोश्रीवर फार चकरा मारू नका नाही तर तिथलेही सरडे आत्महत्या करतील असा टोला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.

  • 07 Dec 2023 04:59 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांनी केली मोठी विनंती

    माझी हात जोडून विनंती आहे आत्महत्या करू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 07 Dec 2023 04:38 PM (IST)

    छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका

    छगन भुजबळ मराठयांच्या नादी लागू नको, तुला जड जाईल. तुझे वय झाले आहे, मराठ्यांच्या नादी लागसील तर संडास मध्ये जायची वेळ येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 07 Dec 2023 04:33 PM (IST)

    जरांगे पाटील यांचे मोठे विधान

    महाजन म्हणाले होते, 4 दिवसात कायदा होणार नाही 30 दिवस द्या आपण 40 दिवस दिले, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 07 Dec 2023 04:19 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसानाची पाहणी

    नागपूर जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

  • 07 Dec 2023 04:15 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांची टीका

    देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टिका केली आहे. बोले तैसा अजिबात न चाले त्यासी बघून सरडे ही लाजे असे त्यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांवरून सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका

  • 07 Dec 2023 04:08 PM (IST)

    केंद्र सरकारचा साखर कारखानदारांना मोठा धक्का

    केंद्र सरकारने साखर कारखानदारांना मोठा धक्का दिला आहे. ऊसापासून आता इथेनॉल बनावट येणार नाही. केंद्र सरकारने जारी केलं नोटीफिकेशन

  • 07 Dec 2023 04:00 PM (IST)

    बुलढाणामध्ये रोहणा गावात दोन गटातील भांडणातून गोळीबार

    बुलढाणामध्ये रोहणा गावात दोन गटातील भांडणातून गोळीबार झाला आहे. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून वाद झाल्याची माहिती समजत आहे. तिघांनी वाद घातला आणि गोळीबार करत फरार झाले.या गोळीबारात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झालेत. खामगाव तालुक्यातील रोहना गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राजेंद्र भोसले मृत तरूणाचं नाव आहे.

  • 07 Dec 2023 03:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नांमध्ये सुटा बुटातील चोरट्यांच्या सुळसुळाट

    लग्नाचा सिझन सुरू असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्नात वधू-वर वऱ्हाडी मंडळींचा ऐवज लांबवणाऱ्या चोरांच्या टोळ्या यंदाही सक्रिय झाल्याय. हे चोरटे सुटा बुटामध्ये येऊन लग्नांमध्ये चोऱ्या करत असल्याचे प्रकार घडत आहे. गेल्या ६ दिवसांत ३ मोठे लग्नसमारंभ, एका साखरपुड्यातून 14 तोळे सोने, 4 लाख रोख आणि 3 मोबाईल लंपास झाले.

  • 07 Dec 2023 03:30 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांची जहरी टीका

    नवाब मलिकांवरून सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीये. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेणारे देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्या मंत्री पदाबद्दल असे कसे विचारू शकतात, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.

  • 07 Dec 2023 03:15 PM (IST)

    रुपाली चाकणकरांबद्दल कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट केली नाही- प्रदीप कणसे

    रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत.

    रूपाली चाकणकर यांनी दिवाळीत बळी राजाच्या डोक्यावर पाय ठेवणाऱ्या वामनाचे चित्र पोस्ट केले होते.  हे संकल्प चित्र बळीराजा बद्दलच्या एतिहासिक तथ्यांवर अन्याय करणारे असल्याने आपण त्याला आक्षेप घेतला होता.  मात्र आपण रुपाली चाकणकर यांच्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह लिखान केले नाही असा दावा प्रदीप कणसे यांनी केला

  • 07 Dec 2023 02:57 PM (IST)

    ओबीसी समाजाचा धडक मोर्चा

    ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीच्या जतमध्ये ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला. जत तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जत तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्री छगन भुजबळ यांना व त्यांच्यासह ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यावे त्याचबरोबर बिहारच्या धरतीवर जातींनी आहे जनगणना करण्यात यावी तसेच मराठा समाजाला ओबीसी ऐवजी अन्य घटनात्मक स्वतंत्र आरक्षण द्यावे, त्याचबरोबर ओबीसी महामंडळांना भरघोस निधी द्यावा यासह विविध मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या.

  • 07 Dec 2023 02:52 PM (IST)

    स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

    भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट विस्तारत आहे. टाटा मोटर्सने यापूर्वी कॉम्पट कारचे स्वप्न भारतीयांना दाखवले. स्वस्त नॅनोचा प्रयोग रुजला नाही. पण टाटाने प्रयत्न सोडले नाही. लवकरच टाटा स्वस्तातील इलेक्ट्रिक कार भारतीयांसाठी बाजारात घेऊन येणार आहे. पण जगभरात पण त्यादृष्टीने प्रयोग सुरु आहेत. आता या इलेक्ट्रिक कारने भारतीय ग्राहकांना नॅनोची आठवण करुन दिली आहे. नॅनोसारखीच छोटी पण स्वस्त इलेक्ट्रिक कारने बाजाराचे लक्ष आकर्षित केले आहे.

  • 07 Dec 2023 02:45 PM (IST)

    गौतम अदानी यांनी मिनिटाला 48.35 कोटी कमावले

    गेल्या दोन दिवसांत, सोमवार आणि मंगळवारी गौतम अदानी यांनी नवा विक्रम केला. त्यांच्या संपत्तीत 16.71 अब्ज डॉलरची भर पडली. अदानी समूहाला गेल्याआठवड्यापासून अनेक आघाड्यांवर आनंदवार्ता येत आहे. या समूहाचे शेअर सध्या वाऱ्याशी स्पर्धा करत आहेत. अदानी समूहाच्या 10 कंपन्यांच्या शेअर्सनी मोठी उसळी घेतली आहे. अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 28 तासांत प्रत्येक मिनिटाला 48.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

  • 07 Dec 2023 02:40 PM (IST)

    मेट्रोच्या विरोधात मनसे आक्रमक

    मेट्रोचे 4 मार्गिकेचे काम करत असताना काल एका कामगाराचा ब्रिजवरुन खाली पडून जागीच मृत्यू झाला ,या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली आहे. कामगाराला योग्य मोबदला जोपर्यंत मिळत नाही तो तोपर्यंत मनसे मेट्रोचे 4 मार्गिकेचे काम होऊन देणार नाही असा इशारा मनसेने दिला.

  • 07 Dec 2023 02:35 PM (IST)

    यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

    सरकारने जमा केलेल्या पिकविम्याची रक्कम घरी नेण्यासाठी तिजोरीला पोलीस सुरक्षा द्यावी या मागणीसाठी यवतमाळमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी निवेदन देऊन सुरक्षा देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना अत्यल्प पीकविमा भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे उपरोधिक आंदोलन केले. तुटपुंजा पीक विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांनी हे अनोखे आंदोलन केले.

  • 07 Dec 2023 02:24 PM (IST)

    सरकारचे प्रश्नांकडे दुर्लक्ष – जितेंद्र आव्हाड

    सरकारच शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई याकडे काही लक्ष असल्याच दिसत नाही. पीकं झोपली आहेत, नुकसान झालं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान देखील नाही, जनतेनं अपेक्षा करणं सोडल्याचा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजितदादांविरुद्ध 33 वर्ष काही बोललो नाही. पण त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली, त्यांनी माझं पोट काढलं नसत तर मी पण काढलं नसतं, असे ते म्हणाले.

  • 07 Dec 2023 02:15 PM (IST)

    मुख्यमंत्री करणार नुकसानीची पाहणी

    राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला. त्याचा शेतीला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करणार आहेत.

  • 07 Dec 2023 02:07 PM (IST)

    समाजवादी पक्षाच्या मोर्चाने वेधले लक्ष

    हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि प्रभाग अधिकारी यांचे मुखवटे घालून समाजवादी पक्षाने मोर्चा काढला. समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक सिरील डिसोझा यांनी मालाड मालवणीच्या विविध समस्यांबाबत मोर्चा काढला होता. मात्र मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मालाड पोलिसांनी माजी नगर सेवक सिरील डिसोझा यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतरही समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मालाड बीएमसीबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि वॉर्ड ऑफिसर यांचे मुखवटे घालून अनोखे आंदोलन केले.

  • 07 Dec 2023 02:02 PM (IST)

    सोने-चांदीत मोठी घसरण

    आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

  • 07 Dec 2023 01:49 PM (IST)

    परभणीत 57 हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान

    जिल्ह्यात तब्बल 57 हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्रशासनाची नोंद आहे. 69 हजार 309 शेतकऱ्यांनी विमा कंपन्याकडे नुकसानीची तक्रार केली आहे. अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, कापूस आणि तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून प्रत्यक्षात आता मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

  • 07 Dec 2023 01:34 PM (IST)

    मालाड बीएमसी कार्यालयात समाजवादी पक्षाचे आंदोलन

    मालाड बीएमसी कार्यालयात समाजवादी पक्षाने आंदोलन सुरू केले आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि वॉर्ड ऑफिसर यांचा मास्क घालून आंदोलन करीत आहेत.

  • 07 Dec 2023 01:22 PM (IST)

    पुणे ते मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत

    पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँटी बसवण्यासाठी दु.12 ते 2 असा दोन तासांचा ब्लॉक जाहीर केला होता. मात्र, हे काम अवघ्या काही 40 मिनिटांमध्ये झाल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. किवळे पासून जुन्या पुणे- मुंबई महामार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली होती.

  • 07 Dec 2023 12:56 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या जि. प. कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

    छत्रपती संभाजीनगरच्या जि. प. कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोर्चात सहभागी झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 पासून राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतनश्रेणी मिळणे, तसेच हा दर्जा मिळेपर्यंत किमान 26 हजार रुपये वेतन, पेन्शन मिळणे ही प्रमुख मागणी आहे.

  • 07 Dec 2023 12:37 PM (IST)

    कोल्हापूरात सकल मराठा समाजाचे जागरण गोंधळ आंदोलन

    हिवाळ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सरकारला मराठा आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी कोल्हापूरात सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

  • 07 Dec 2023 12:20 PM (IST)

    धुळे : राष्ट्रवादी पक्षाच्या अजित गटाच्यावतीने महापालिकेवर मोर्चा

    शहरातील मालमत्ता करधारकांना वाढीव मालकत्ता कराच्या नोटीस धाडल्याने तो रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने महापालिकेवर मोर्चा काढला आहे.

  • 07 Dec 2023 12:00 PM (IST)

    मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक सुरू

    मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसवण्यासाठी ब्लॉक सुरू झाला आहे. दुपारी 2 पर्यंत हा ब्लॉक सुरू राहणार आहे, या वेळेत हा ब्लॉक राहाणार आहे. या कालावधीत मुंबई लेनवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच हलकी वाहने किवळे पुलावरून जुना मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळवण्यात येणार आहेत. तर पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येणार आहेत.

  • 07 Dec 2023 11:49 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाचं आजचं काम संपलं

    हिवाळी अधिवेशनाचं आजचं काम संपलं. उद्या सकाळी 11 वाजता कामकाज पुन्हा सुरू होणार .

  • 07 Dec 2023 11:47 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत – सूरज चव्हाण यांची टीका

    जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी दादांवर वक्तव्य करत असतात अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली.

  • 07 Dec 2023 11:34 AM (IST)

    नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य हे विकृतपणाचं लक्षण – विनायक राऊत

    ठाकरेंमुळे नीलम गोऱ्हे यांनी अनेक पद उपभोगली, गोऱ्हेंना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या. आता नीलम गोऱ्हेंनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे विकृतपणाचं लक्षण आहे, अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केली.

  • 07 Dec 2023 11:29 AM (IST)

    दिशा सालियन प्रकरणाची चौकशी झाल्यावर दूध का दूध, पानी का पानी होईल – भरत गोगावले

    दिशा सालियन प्रकरणाची चौकशी झाल्यावर दूध का दूध, पानी का पानी होईल, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. दिशा सालियन प्रकरणी SIT चौकशी होणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली SIT पथक काम करणार आहे.

  • 07 Dec 2023 11:25 AM (IST)

    आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, पूर्ण मदत करू – देवेंद्र फडणवीस

    महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. शेतकऱ्यांना पूर्ण मदत करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 07 Dec 2023 11:16 AM (IST)

    संजय शिरसाट, मनीषा चौधरी यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती

    संजय शिरसाट, मनीषा चौधरी यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशोमती ठाकूर, चेतन तुपे यांचीही तालिका सभापतीपदी नियुक्ती झाली.

  • 07 Dec 2023 11:07 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, 9 विधेयकं मांडली जाणार

    हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात 9 विधेयकं मांडली जाणार आहेत. नवाब मलिकही अधिवेशनात सहभागी झाले असून ते सत्ताधारी बाकावर बसले आहेत.

  • 07 Dec 2023 10:59 AM (IST)

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

    विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. गळ्यात संत्र्यांची माळ आणि हातात निषेधाचे पोस्टर्स घेऊन विरोधक आंदोलन करत आहेत.

  • 07 Dec 2023 10:45 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधक करत आहेत. आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत.

  • 07 Dec 2023 10:30 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

    “राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतंय. हे अधिवेशन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. सर्व प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होईल. या अधिवेशनादरम्यान अपात्र याचिकेवर सुनावणी घेणार आहे. जास्तीत जास्त वेळ घेऊन मी सुनावणी घेणार आहे. सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करणं आव्हानात्मक असेल. पण अधिवेशनात पूर्ण वेळ देऊन महत्वपूर्ण बाबी असतील त्यावर मी लक्ष देईन,” असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

  • 07 Dec 2023 10:15 AM (IST)

    राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी- रोहित पवार

    राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवांची याबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. परंतु या सरकारने कॅसिनोच्या ‘महत्त्वाच्या’ विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं. हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ ‘अनुभवी’ नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावं, ही विनंती, असं ट्विट राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलंय.

  • 07 Dec 2023 09:58 AM (IST)

    Maharashtra News : विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला

    नवी मुंबईत परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नेरुळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

  • 07 Dec 2023 09:47 AM (IST)

    Maharashtra News : शिंदे समिती तपासणार कुणबी नोंदी

    पुणे विभागात कुणबी नोंद तपासणी करण्यात येणार आहे. शिंदे समिती पुणे विभागातही कुणबी नोंदणी तपासणार आहे. त्यानुसार पाच जिल्ह्यांमधील संस्थानांकडे असलेल्या जुन्या नोंदी तपासण्याच्या आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.

  • 07 Dec 2023 09:31 AM (IST)

    Maharashtra News : राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन वाद

    हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन वाद निर्माण आहे. हिवाळी अधिवेशनासाठी केवळ अजित पवार यांच्या गटाला कार्यालय दिले आहे. यामुळे शरद पवार गट आक्रमक होणार आहे.

  • 07 Dec 2023 09:22 AM (IST)

    Maharashtra News : चुकीच्या उपचाराने दोन जणांचा बळी

    नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील आकाशदीप रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाइकांनी मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टर कारणीभूत असल्याचा आरोप गेला. दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दोन तीन मिनिटात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे मृतांचे नातेवाईक सांगत आहे.

  • 07 Dec 2023 09:08 AM (IST)

    Maharashtra News : आदित्य ठाकरेची चौकशी होणार

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिशा सालियान प्रकरणी सरकार ठाकरे यांची SIT चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार आहे. दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते.

  • 07 Dec 2023 08:57 AM (IST)

    Maratha Reservation : यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये आज जरांगेंची सभा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांची आज यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये सभा होणार आहे. यवतमाळमधील राधाकृष्ण मंगल कार्यालयमध्ये मनोज जरांगे सध्या थांबलेले आहेत. वाशीममध्ये जरांगे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर पोलिसबंदोवस्तात वाढ करण्यात आली आहे.

  • 07 Dec 2023 08:50 AM (IST)

    Maharashtra News : नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहाणार

    नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहाणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे अद्यापही निश्चित केलेलं नसल्यानं ते अधिवेशनात नेमके कोणाच्या बाजून उभे राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

  • 07 Dec 2023 08:42 AM (IST)

    Winter Assembly 2023 : अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार

    आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे एकाच कार्यालयात बसणार आहे. विधानभवन परिसरातील कार्यालयावर तशी नेमप्लेट देखील लागली आहे.

  • 07 Dec 2023 08:35 AM (IST)

    Pune News : पुणेकरांनी केला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना

    पुण्यात काल रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. गणपती माथा ते शिवणे दरम्यान दोन ते तीन किलोमिटरच्या रांगा लागलेल्या दिसल्या. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त्र झालेले आहेत.

  • 07 Dec 2023 08:25 AM (IST)

    Maharashtra News : चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौरा पुठे ठकलाला

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौरा पुठे ठकलाला आहे. बावनकुळे आज आणि उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार होते. सोलापूर आणि माढा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा करण्यात येणार होता. अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर दौरा पूढे ढकरलला असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 07 Dec 2023 08:20 AM (IST)

    Winter Assembly 2023 : नागपूरात मुख्यमंत्री शिंदे यांचं 25 फुटाचं कटआऊट

    नागपूरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. राज्यभरातील मंत्री आणि आमदार नागपूरात दाखल झालेले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या अनुशंगाने नागपूरच्या आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं 25 फुटाचं कटआऊट लावण्यात आलं आहे.

  • 07 Dec 2023 08:08 AM (IST)

    Maharashtra News : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक

    मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसवण्यासाठी आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक राहाणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यानी यांची नोंद घ्यावी. ब्लॉग दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळवली जाणार आहे.

  • 07 Dec 2023 08:04 AM (IST)

    Mumbai News : मुंबईतील काही भागात आज पाणी कपात

    मुंबईतील माहिम, पेडर रोड या भागात आज पाणी कपात करण्यात येणार आहे. जलाशयाच्या पुनः बांधणीसाठी आज काम करण्यात येणार आहे.

  • 07 Dec 2023 07:57 AM (IST)

    ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्या मुलाचा राजीनामा

    ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचा मुलगा डॉ. अमेय ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. ललित पाटील प्रकरणामुळे डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अमेय ठाकूर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेय ठाकूर हे ससून रुग्णालयात सर्जरी विभागाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते.  संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर तात्काळ अमेय ठाकूर यांनी देखील राजीनामा दिला आहे.  विशेष म्हणजे संजीव ठाकूर यांनी लागलीच हा राजीनामा मंजूर केल्याचं देखील समोर आलंय.

  • 07 Dec 2023 07:53 AM (IST)

    अधिवेशन काळात कोणते मुद्दे गाजणार?

    अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, शेतकरी प्रश्न मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे मुद्दे या हिवाळी अधिवेशनात  गाजणार आहेत.

  • 07 Dec 2023 07:47 AM (IST)

    फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

    पुणे रेल्वे विभागाकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  नोव्हेंबर महिन्यात रेल्वे प्रशासनाकडून 2 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. नंबर महिन्यात तब्बल 28 हजार 301 फुकट्या प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. तर विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटी 50 लाख 63 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात पुणे रेल्वे विभागात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.  विनंती तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सह होऊ शकतो, तुरुंगवास रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

  • 07 Dec 2023 07:38 AM (IST)

    अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार आहेत. नागपूर विधानभवन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित दादा यांची नेमप्लेट लागली आहे. काल कार्यालयावर अजितदादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची नेमप्लेट लागल्याने शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली होती. आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोन्ही गटाच्या नेत्यांची नेमप्लेट आहे.

  • 07 Dec 2023 07:30 AM (IST)

    Maharashtra Assembly Winter Session 2023 : अधिवेशनाला सुरुवात होणार

    आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशन काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

Published On - Dec 07,2023 7:26 AM

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.