मायबाप सरकार, मदत करा, सांगा कसं जगायचं? बळीराजाची काळीज चिरणारी हाक, होतं नव्हतं सगळं गेलं
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात तीन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांची कपाशीची पिके करपून गेली. शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.

कधी सततचा पाऊस, त्यामुळे ओल्या दुष्काळाने शेती पाण्याखाली जाते, तर कधी पावसाच्या अभावामुळे पिकं करपून जातात. राज्यात बळीराजाच्या नशिबी सततचे हालच लिहीले की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्याही मोठ्या प्रमाणात होत असून निसर्गाच्या बेभरवशी कारभारामुळे जगायचं तरी कसं असा प्रश्नच सध्या बळीराजाला पडला आहे. अशीच काहीशी परिस्थिती बीड जिल्ह्यातही उद्बवली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. तीन दिवसाच्या पावसाने उभी कपाशी करपून गेल्याने हुंदके देत शेतकऱ्याने पीकं उपटून फेकली. मायबाप सरकार मदत करा, सांगा आता मी जगायचं कसं ? असा सवाल साश्रूनयनांनी त्या शेतकऱ्याने विचारला आहे.
सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान
बीड जिल्ह्यातील काही भागात सतत तीन दिवस झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांचे तीन दिवसाच्या पावसाने 4 एकर शेतातील उभी कपाशी करपुन गेली आहे.तर दुसरीकडे या नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, मग पाहणी करू, पंचनामा करू अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी हुंदके देत संताप व्यक्त केला आहे.
याचदरम्यान मायबाप सरकारने तात्काळ पाहणी करून पंचनामा करून आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे. चार दिवसात मदत नाही आली तर आत्महत्या करणार, मला पर्याय उरला नसल्याचंही काळे म्हणाले.
खरीप हंगामातील पिकांवर रोगांचे संकट
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी ओढे आणि छोटे मोठे नाले दुथडी वरून वाहू लागले तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी खरीप हंगामातील कपाशी,सोयाबीन,तूर यासह अनेक पिके पाण्याखाली गेली. मात्र आता ही पाण्याखाली गेलेली पिके संकटात सापडली आहे. शेतातून पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने ही पिके काळी पडून त्यांच्यावर मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे.
महागड्या औषधांची फवारणी करून देखील या रोगांवर नियंत्रण मिळविता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. कपाशीची झाडे जळून जाणे आणि पातेगळ होणे हे प्रकार प्रामुख्याने आता निदर्शनास येत आहे. दरम्यान कृषी विभागाने रोगांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होऊ लागली.
