काय म्हणताय धाराशिव… ही टॅग लाईन बनलीय शिंदे गटाची डोकेदुखी, महायुतीत ठिणगी, काय घडतंय ?
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिंदे गट यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर वातावरण तापले. पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर 'काय म्हणताय धाराशिव?' टॅगलाईन वापरून सावंत यांच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यांवरून टीका केली आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

महाराष्ट्रात महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार जोरात चालत असलं तरीही काही ठिकाणी मात्र या युतीत कुरघोडी, वाद, कुरबुरी सुरूच असल्याचे दिसते. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (shivsena Shinde action) यांच्यातही धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा असून धाराशिवमध्ये तर काही दिवसांपूर्वी हे स्पष्ट दिसलं होतं. आमदार तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली केली. मात्र त्यानंतर आता हाँ वाद वाढण्याची शक्यता असून आ. सावंत यांच्याविरोधात सोशल मीडियावरून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठिणगी आणखीनच पेटल्याचे दिसत आहे.
सावंत यांच्या टीकेनंतर संतापले पाटील यांचे समर्थक
धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच भडकल्याचे दिसत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. “ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केलं, आता हे लोक तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडीही देतील,” अशा शब्दांत सावंतांनी तोफ डागल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली होती. मात्र सावंत यांच्या टीकेनंतर आता राणा जगजीत सिंह पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यानी आ. सावंत यांच्यावरच जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणताय धाराशिव… टॅग लाईन बनलीय शिंदे गटाची डोकेदुखी
राणा जगजीत सिंह पाटील यांचे कार्यकर्ते संतापले असून त्यांनी सावंत यांना लक्ष्य केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. “काय म्हणताय धाराशिव?” या टॅग लाईन खाली आमदार सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून देत, त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेत भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची मोहीम उघडली आहे. “हाफकिन कोण आहे?” आरोग्यमंत्री असताना सावंत यांनी असा प्रश्न विचारला होता. एवढंच नव्हे तर “महाराष्ट्राला भिकारी करीन, पण मी भिकारी होणार नाही” असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानांमुळे मोठी खळबळ माजली होती, ते प्रकरण चांगलंच पेटलं होतं. सावंत यांच्या या सर्व वादग्रस्त वक्तव्यांचा आ. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडिया वरती उल्लेख केला जात आहे .
तसेच “काय म्हणताय धाराशिव?” या टॅगलाईनखाली भाजप कार्यकर्ते आणि समर्थक तानाजी सावंत यांच्यावर टीका करत आहेत. तर काही पोस्टमध्ये सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे, एवढंच नव्हे तर काही पोस्टमध्ये त्यांच्यावर राजकीय आरोपही करण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्यांची धुसफूस आणखीनच वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
