पटक पटक कर मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचं महाराष्ट्रात स्वागत करु, देवेंद्र फडणवीसांचे विधान, विरोधक आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात हिंदी-मराठी वाद चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दुबे यांचे स्वागत करण्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात संताप आहे. विरोधी पक्षनेत्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंनी दुबेच्या धमकीवर खोचक टोला देत प्रतिक्रिया दिली होती. आप मुंबई आइए. मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंबद्दल एक विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात आले तर संविधानिकरीत्या त्यांचे स्वागत करू, असे म्हटले आहे. यावरुन आता एकच गदारोळ सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या स्वागताच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला. ते म्हणाले की, याचा अर्थ सरळ असा आहे की हे मराठी भाषेचे विरोधक आहे. लाथो के भूत बातो से… निशिकांत दुबे यांनी यावं मग त्यांनी स्वागत करावं नाहीतर आम्ही स्वागत करू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांचा फार संपर्क आहे का? मला असं वाटतं त्यांचा आमदारांशी संपर्क तुटला आहे. तुम्ही ईडी, सीबीआय जर बाजूला केले तर हे सगळे वापस परत धावत येतील, असा टोला अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना लगावला. तुमच्या मानसिक दबावाखाली हे लोक आज काम करतात, बाकी तुमच्याकडे पाहून येणं असं काहीही तुमच्यामध्ये नाही. प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे आहे कोण कशामुळे तुमच्याकडे आला, असा टोला दानवेंनी लगावला.
संजय राऊतांचा टोला
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही निशिकांत दुबे यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हटले. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी हे पायघड्या घालणार आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकतात, त्यांची त्यांना चिंता जास्त आणि हे चुकीचं वाटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत त्यांचा दौरा आहे त्या दौऱ्यात हे सगळे विषय तिकडे घेतले जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. सात तारखेला इंडिया आघाडीचे बैठक राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
अविनाश अभ्यंकरांचा इशारा
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही यावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “जे खासदार मराठी माणसाचा अपमान करतात, त्यांच्यासाठी पायघड्या घालणे हे दुर्दैवी आहे. तो खासदार एक ‘वाचळवीर’ आहे. जो खासदार मराठी माणसाचा अपमान करतोय, त्याला पायघड्या टाकत असू तर दुर्दैव आहे. मला आवडलं असतं की आपल्या सरकारने ह्या वाचळवीराला माफी मागायला लावली असती. मराठी माणसाला का दृष्ट लावताय, ह्याला आवरा असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगाव. येऊ तर देत, राजसाहेबांनी सांगितलं कस स्वागत करायचं ते, असा इशारा अविनाश अभ्यंकर यांनी दिला.
