वर्ध्यात लग्नकार्यांत संचारबंदीच ’विघ्न’, कुठं तारीख पुढे ढकलली, तर कुठं मोजक्या माणसांमध्ये ‘शुभ मंगलं’

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे अनेक निर्बंध लागू झालेत. त्यामुळे अनेक घटकांवर परिणाम होण्यास सुरुवात झालीय.

  • चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा
  • Published On - 18:24 PM, 21 Feb 2021
वर्ध्यात लग्नकार्यांत संचारबंदीच ’विघ्न’, कुठं तारीख पुढे ढकलली, तर कुठं मोजक्या माणसांमध्ये 'शुभ मंगलं'

वर्धा : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे अनेक निर्बंध लागू झालेत. त्यामुळे अनेक घटकांवर परिणाम होण्यास सुरुवात झालीय. वर्ध्यातही आज रविवार (21 फेब्रुवारी) असल्यानं अनेकांकडं या दिवशी लग्नाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते. मात्र, संचारबंदीनं या मंगल कार्यालयांच्या अडचणीत वाढ केलीय. कुणाला परवानगी घेत मर्यादीत संख्येत लग्न कार्य उरकावं लागलं, तर कुणाला लग्न कार्यच रद्द करत पुढं ढकलावं लागलंय (Many marriages canceled some arranged in limited people in Wardha amid Corona).

लग्न म्हटलं की गजबजून राहणारा मंगल कार्यालयाचा परिसर लग्न असताना देखील आता शांत आहे. ना बँड, ना घोडा, ना वऱ्हाड्यांची गर्दी. बोटावर मोजण्याइतक्या पंधरा ते वीस जणांच्या उपस्थितीत लग्नं कार्य पार पडत आहेत. मुलगा-मुलगी बाहेर जिल्ह्यातील असले तरी त्यांनी वर्ध्यात विवाह केलायं. पण, संचारबंदीमुळं कुटुंबियांना परवानगीसाठी ऐनवेळेवर धावपळ करावी लागली. बँड, घोडा आदी रद्द करावं लागलं. लग्न झाल्याचा आनंद असला तरी सोहळा मात्र साधेपणानंच करावा लागला.

अनेक लग्न सोहळे रद्द, काही ठिकाणी मोजक्या माणसांमध्ये विवाह संपन्न

परवानगी घेतलेले अपवादानंच कमी उपस्थितीतीत विवाह सोहळे झाले खरे, पण काहींनी लग्न सोहळाच रद्द केलाय. संचारबंदीमुळं अडथळा तर येणार नाही ना, या विचाराने काहींनी लग्नच पुढं ढकललंय. यामध्ये मंगल कार्यालय चालकांसोबतच इतरही व्यावसायिकांचंही मोठं नुकसान होतंय. लग्न आयुष्यातील महत्त्वाचा क्षण, त्यासाठी अनेक जण वेगवेगळे बेत आखतात. पण, संचारबंदीनं अशा अनेक बेतांवर पाणी फेरलंय. लग्न झालेल्यांना आणि लग्न पुढं ढकलाव लागणाऱ्यांना मात्र संचारबंदीचा अनुभव गाठीशी राहणार, हे नक्की.

कोरोनामुळे साध्या लग्नांचीही पद्धत सुरु 

असं असलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साधेपणाने लग्न करण्याची नवी परंपराही तयार होत आहेत. फार मोठा गाजावाजा न करता अनेक लोक अगदी जवळच्या मोजक्या नातेवाईकांमध्ये लग्न करत आहेत. पत्रिका छापण्याचा आणि ते वाटत फिरण्याचा प्रघात तर बंदच झाल्यात जमा आहे. व्हॉट्सअॅपवर डिजीटल पत्रिका आणि फोन कॉल हे नवं आमंत्रण देण्याचं माध्यम झालंय. त्यामुळे कोरोनाने मनातील अपेक्षांना मुरड घालावी लागत असली तरी काही चांगल्या गोष्टीही घडताना दिसत आहेत.

हेही वाचा :

वर्ध्यात शेतकरी नेत्यांची सभा घेणाऱ्या आयोजकांवर गुन्हा, जमावबंदीच्या आदेशाला डावलून शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी

वर्ध्यात कोरोनाचा वाढता प्रकोप, 5 दिवसात 451 रुग्ण, 36 तासाची संचारबंदी

Wardha Curfew | वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद

व्हिडीओ पाहा :

Many marriages canceled some arranged in limited people in Wardha amid Corona