हा आकाच खरा सूत्रधार, सुरेश धस म्हणाले काय? त्या दोन पोलिसांचा उल्लेख करत केली ही मागणी
Suresh Dhas First Reaction : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे समोर आले. त्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोन पोलिसांचा उल्लेख करत त्यांनी ही मागणी केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे दोषारोप पत्रात समोर आले आहे. त्यानंतर हे प्रकरण धसास लावून धरणाऱ्या प्रत्येकीची जळजळीत प्रतिक्रिया येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली. तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोन पोलिसांचा उल्लेख करत त्यांनी ही मागणी केली आहे.
वाल्मिकच खरा आका
वाल्मिक कराड हा मास्टर माइंड, मुख्य सूत्रधार आणि आका सर्व काही तोच आहे. हा आकाच सर्व काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यात यांनी धुमाकूळ घातला होता. गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यांना मदत करणं, पैसा पुरवणं. पैसा जास्त झाला. बोगस पैसे उचलायचे आणि गँग तयार करायच्या, टोळ्या पकडायच्या. त्यांना अभय द्यायचं. त्यांच्याकडून पाहिजे ती कामे करून घ्यायची. अशा पद्धतीचा यांचा उद्योग होता. त्यामध्ये वेगळं काही नाही. एसआयटीने जे मांडलं ते योग्य आहे. यांच्या हा सूत्रधार जो आहे, वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे. बाकीचे प्यादे आहेत. एसआयटीने एकत्रित जंत्री केलेली दिसते, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
कलम ३४ प्रमाणे सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. खून करायला जरी प्रत्यक्ष वाल्मिक कराड त्या जागेवर नसला तरी त्याच्या आदेशानेच खून झाला आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे. दोन नावे वगळली आहेत. त्यांचा संबंध नसेल तर वगळली असेल. त्याबाबत आमचं म्हणणं नाही, असे धस म्हणाले.
त्या दोन पोलिसांना सहआरोपी करा
याप्रकरणातील महाजन आणि राजेश पाटील या दोन पोलिसांची त्यात गुंतवणूक आहे. जोड आरोपपत्र टाकण्याची वेळ आली तर ते करावं. पण त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी आमदार धसांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. तर अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
