रोहित पवारांनी…; कानाखाली मारीन वक्तव्यावर मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर एका ग्रामसेवकावर संताप व्यक्त करणाऱ्या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट केला असून, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना आवरण्याची मागणी केली आहे.

परभणीच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होता आहे. या व्हिडीओ त्या एका ग्रामसेवकावर संतापताना आणि ‘कानाखाली मारीन’ असं म्हणताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे. या व्हिडीओवरुन सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका कार्यक्रमात एका ग्रामसेवकाने महिलांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्या महिलांनी भर कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर संतप्त झालेल्या बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला जाहीरपणे खडसावलं. “असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन पगार कोण देते हा आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी” अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला होता. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
यानंतर हा व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्वीट केला. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!, अशी मागणी रोहित पवारांनी व्हिडीओद्वारे केली होती.
मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण
या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगीनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे. जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका… कृपया, अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणे बंद करा, पोलीस ठाण्यात जावून दादा्गिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगल… जय जिजाऊ , जय अहील्या , जय सावित्री, असे ट्वीट मेघना बोर्डीकर यांनी केले.
त्यासोबतच मेघना बोर्डीकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोण रोहित पवार, पोलीस ठाण्यात पोलिसांना जाऊन कानाखाली लावेल म्हणणारे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. काल मी जे वक्तव्य केले ते त्रागा होता. २० हजार लोकसंख्या असलेल्या गावात जनतेच्या लाभाच्या योजना लागू करण्यासाठी पैसे मागतो, मग नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्याची पूजा करायला पाहिजे होती का? असा सवाल मेघना बोर्डीकर यांनी केला.
रोहित पवारांनी अर्धवट व्हिडीओ ट्विट करून जनतेची दिशाभूल करू नये. लोकांनी मला गोरगरिबांची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे आणि मी तेच काम करत होती. लाडक्या बहिणी आणि गोरगरिबांचे काम करण्यासाठी सरकार पगार देते, असे मी त्या व्हिडिओमध्ये पुढे मांडलेले आहे. अशा लोकांना अशीच भाषा समजते. पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी (माजी आमदार विजय भांबळे) यांनी त्यांनाही सवय लावून ठेवलेली आहे. योजनांसंदर्भात टाळाटाळ होत असेल तर ते मी कसं खपवून घेणार? माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांना काही काम राहिलेले नाही. उंटावर बसून शेळ्या हाकू नका, इथे येऊन बघा. तुमचे चमचे (माजी आमदार विजय भांबळे) अजित दादांच्या पक्षात गेलेले आहेत, त्यांनी काय प्रकार केले हेही बघा, असेही त्या म्हणाल्या.
