आमचा लढा…, मनसेनं पुन्हा मराठी भाषेवरून भाजपला घेरलं
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसेनं भाजपला घेरल्याचं पाहायला मिळालं, मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी मागणी राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती. मनसेनं मराठी भाषेच्या मुद्द्यावर मोठं आंदोलन उभारलं, त्यानंतर या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली. दरम्यान दबाव वाढत असल्यानं अखेर सरकारनं त्रिभाषा सूत्रांबाबतचे दोन्ही जीआर मागे घेतले. जीआर मागे घेतल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला होता, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होत मनसेनं मिरा -भाईंदरमध्ये मोठा मोर्चा देखील काढला होता, या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठी भाषिक सहभागी झाले होते. त्यानंतर मिरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची देखील सभा झाली, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये अविनाश जाधव यांनी स्थानिक आमदार नरेंद्र मेहेतांवर मराठीच्या मुद्द्यावरून तोफ डागली आहे. संदीप राणे आंदोलन करतात, तेव्हा अख्खा पक्ष त्यांच्या पाठीशी असतो. मराठीसाठी बोलणं लाजिरवाणं नाही, अभिमानाचं आहे. मुझफ्फर हुसेन यांच्या भाषणानं मन जिंकलं, अशाच लोकांची राजकारणात गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे नेते मराठीमध्ये संवाद साधतात, मग तुम्हाला काय अडचण आहे? असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी केला आहे. दरम्यान मनसेचा लढा भाषेसाठी, अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आहे, असंही यावेळी जाधव यांनी म्हटलं आहे.
मिरा भाईंदरमध्ये अमराठी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, हा मोर्चा भाजपच्या पाठिंब्यानं काढण्यात आला, असा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यानंतर मनसेनं देखील मिरा भाईंदरमध्ये भव्य असा मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर राज ठाकरे यांची मिरा-भाईंदरमध्ये एक सभा देखील झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती.
