Mumbai Mayor : महापौरपदाबाबत तडजोड नाहीच ! भाजपने स्पष्टच सांगितलं, नेत्यांनाही महत्वाचे निर्देश
मुंबई महापौरपदासाठी भाजपने कोणतीही तडजोड न करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही मित्रपक्ष शिंदे गटासोबत सत्तावाटपाची चर्चा सुरू असताना, दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत महापौरपद राखण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवार, २२ रोजी महापौरपदाची सोडत आहे, त्यामुळे भाजपची ही भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 89 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष ठरला आहे. तर या निवडणुकीत त्यांच्यासोबत युती केलेल्या शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. दोघांच्या मिळून 118 जागा होत असून आता महापौरपदावरून चर्चा सुरू आहे. येत्या गुरूवारी, 22 तारखेला महापौर पदासाठी सोडत काढली जाईल . अखेर मुंबईचा महापौर कोण होणार याची सर्वानंच उत्सुकता आहे, मात्र मुंबईचं महापौर पद हे आप्लायकडेचं आलं पाहिजे, त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही असं भाजपने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईचं महापौर पद मिळवण्यावर भारतीय जनता पक्ष ठाम असून त्यात कोणतीच तडजोड करण्यात येणार नाहीये. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत अशीही चर्चा आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र असं करतानाचा मित्रपक्षांशी कोणताही कडवटपणा येऊ देऊ नका, कटुता टाळा असा सल्लाही देण्यात आला आहे.
महापौरपदावर भाजपा ठाम
बऱ्याच वर्षांनी, खूप वाट पाहिल्यानंतर भाजपला मुंबई महानगरापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे महापौर पद आपल्याकडेच यायला हवं, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. त्यामुळेच मुंबईचं महापौरपद आपल्याकडेच राहावे, यावर भाजप ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणं आहे. मुंबई व अन्य महापालिकेत महायुतीत सन्मान जनक तोडगा काढा असे निर्देश दिल्लीतील नेतृत्वाने दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाण्याच्या महापौरपदासाठीही भाजपने दोन वर्षांचा दावा कायम ठेवला आहे.
पालिकेत पक्ष कार्यालयात होणार वाढ ?
मुंबई महापालिकेत गेली तीन वर्षे बंद असलेली पक्ष कार्यालये आता लवकरच खुली होतील. मात्र या वेळी शिवसेनेचे दोन गट व ‘एमआयएम’चे आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे पालिकेतील राजकीय पक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांच्या गटांना कार्यालय द्यावी लागणार आहेत . त्याकरिता मुंबई महापालिका प्रशासनाला तयारी करावी लागेल. मुंबई महापालिकेची मुदत मार्च 2022 मध्ये संपल्यानंतरही माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार काही काळ पालिकेतील पक्ष कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये शिवसेनेच्या दोन गटांत पक्ष कार्यालयातच मोठा वाद झाला. दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने सर्व पक्ष कार्यालयांना टाळे ठोकले
पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार एखाद्या गटाचे दोन नगरसेवक असले आणि त्यांनी पक्ष कार्यालयाची मागणी केली तर त्यांना कार्यालय द्यावे लागते. मात्र त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे गट म्हणून नोंदणी करावी लागते. समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनाही पक्ष कार्यालये द्यावी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिला नगरसेवक निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असले तरी मुंबई महापालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक महिला नगरसेवक निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा मुंबई महापालिकेवर १३० नगरसेविका निवडून आल्या आहेत. एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा १३० महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदाही मोठ्या संख्येने महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी नियमानुसार ११४ प्रभाग हे महिलांसाठी राखीव होते. मात्र या निवडणूकीत अनेक राजकीय पक्षांनी खुल्या प्रभागातही महिला उमेदवार दिले होते.
मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक नगरसेविका या भाजपच्या आहेत. त्याखालोखाल शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) यांचे नगरसेविका आहेत भाजपच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या ३८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या १९ आणि काँग्रेसच्या ११ आणि मनसेच्या पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर एमआयएमच्याही पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत.
