मोठी बातमी: उच्च न्यायालयाकडून वरवरा राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी

तुरुंगात असलेल्या वरवरा राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड खालावली आहे. | Varavara Rao

मोठी बातमी: उच्च न्यायालयाकडून वरवरा राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी

मुंबई: नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव (Varavara Rao) यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार वरवरा राव यांना 15 दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल. तसेच वरवरा राव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याचीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. (HC orders to shift Varavara Rao to Nanvati hospital for treatment )

वरवरा राव हे सध्या 81 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. यासाठी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. अखेर वरवरा राव यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता न्यायालयाने त्यांना रुग्णालायात दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वरवरा राव हे जवळपास मृत्यूशय्येवर आहेत. त्यांना उपचारांची गरज आहे. तळोजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होतील की नाही, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. आम्ही केवळ 15 दिवसांसाठी त्यांना नानावटी रुग्णालयात हलवण्याचे आदेश देत आहोत. त्यानंतरचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय वरवरा राव यांना रुग्णालयातून सोडले जाऊ नये. तसेच त्यांच्या प्रकृतीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात यावा, असेही न्यायालयाने सांगितले.

ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी वरवरा राव यांच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद केला. केवळ 15 मिनिटांच्या व्हीडिओ कॉलद्वारे वरवरा राव यांच्या प्रकृतीचे निदान करता येणार नाही. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि योग्यप्रकारे शारीरिक चाचणी करण्याची गरज असल्याचे इंदिरा जयसिंह यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांचा या युक्तिवाद ग्राह्य धरत वरवरा राव यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याचा आदेश दिला.

नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या:

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात

माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIAचा आरोपपत्रात दावा

(HC orders to shift Varavara Rao to Nanvati hospital for treatment )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI