Congress : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वीच हात दाखवला, विदर्भात मात्र इनकमिंग सुरू
Outgoing from Congress : राष्ट्रीय पक्ष काँग्रेसला त्यानेच मोठ्या केलेल्या नेत्यांनी कमकुवत केले. अनेक बडे नेते गेल्या दोन वर्षांत काँग्रेसला हात दाखवून बाहेर पडले. ही गळती अजूनही थांबलेली नाही. या गळतीला ब्रेक तरी कोण लावणार?

Leader Left Congress : राष्ट्रीय काँग्रेसने राज्यात अनेक नेत्यांना मोठे केले. त्यांना मोठ-मोठी पदं दिली. मात्र ऑपरेशन लोट्समध्ये यातील अनेक नेत्यांनी काँग्रेसला पाठ दाखवली. अनेक बडे नेते गेल्या दोन वर्षांत काँग्रेसला हात दाखवून बाहेर पडले. ही गळती अजूनही थांबलेली नाही. या गळतीला ब्रेक तरी कोण लावणार? असा सवाल विचारल्या जात आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा एकदा काही पदाधिकारी काँग्रेसला सोडून गेले आहेत. काहींनी राष्ट्रवादी जवळ केली आहे. तर काहींनी कमळ हाती घेतले आहे.
कोल्हापूरात काँग्रेसला मोठा धक्का
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. विनायक उर्फ अप्पी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार शिवाजी पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या राजकीय खेळीने मतदारसंघात गणितं बदलणार अशी चर्चा होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे.
विनायक पाटील आज मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबईत घेतलेल्या भेटीनंतर विनायक उर्फ अप्पी पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानल्या जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अप्पी पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खमलेटी , महागावचे सरपंच प्रशांत शिंदे , श्रीशैल पाटील त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
कराडमध्ये पदाधिकारी भाजपमध्ये
कराड उत्तर मतदार संघातही पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रीय काँग्रेसला धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील तळबीड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मृणालिनी उमेश मोहिते उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. मंत्री जयकुमार गोरे आमदार डॉ अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
रोहामध्ये काँग्रेसला धक्का, समीर सकपाळ राष्ट्रवादीत प्रवेश
रायगडच्या रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सकपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे रोहा शहरातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होताना दिसत आहे.
आज खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रोहा शहरात सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून समीर सकपाळ यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. या प्रवेशामुळे इंडिया आघाडीला रोहात मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं.
अकोल्यात शिंदे सेनेला फटका, काँग्रेसमध्ये अनेकांचा प्रवेश
पश्चिम विदर्भात, अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका बसला आहे. तर पक्षाचे जेष्ठ नेते,माजी जिल्हाप्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्कप्रमुख विजय मालोकार यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. तर पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे (एसटी) संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. 1999 मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. त्यात त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढली होती. यात 2004 मध्ये ते अपक्ष म्हणून 40 हजार मते मिळवत अल्प मतांनी पराभूत झाले होते. 2009 मध्ये ‘जनसुराज्य पक्षा’चे उमेदवार म्हणून मालोकारांनी 30 हजार मते घेतली होती. मालोकार यांच्याकडे उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
