तुमच्या लहानपणीचे खेळ आता पुन्हा मैदानात, मुंबईत अनोख्या स्पर्धेचे आयोजन
मुंबईत "खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ" आयोजित करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा महाकुंभ १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. लेझिम, फुगडी, लगोरी आदी अनेक पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याचा हे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्राच्या पारंपारिक खेळांना पुनरुज्जीवन देण्यासाठी मुंबईत ‘खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर 13 ऑगस्ट ते २२ ऑगस्टदरम्यान हा ‘क्रीडा महाकुंभ’ होणार आहे. यामध्ये लेझिम, फुगडी, लगोरी, विटी-दांडू यांसारख्या अनेक पारंपरिक खेळांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. हे खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. काळाच्या ओघात हे खेळ दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे नवीन पिढीला शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.
विविध खेळांचा समावेश
या महाकुंभात महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यात कबड्डी, खो-खो, लगोरी, लेझीम, रस्सीखेच, मल्लखांब, पावनखिंड दौड, कुस्ती, पंजा लढवणे, विटी-दांडू, दोरीच्या उड्या, फुगडी आणि योग यांचा समावेश आहे. क्रीडा भारती संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली जात आहे.
सहभागासाठी आवाहन
यापूर्वीही मुंबईत अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धांना जनतेने भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या महाकुंभातही जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. ज्या संस्था किंवा क्रीडा मंडळांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी ९८६७०६६५०६ किंवा ९७६८३२७७४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, अशी माहिती क्रीडा भारतीकडून देण्यात आली आहे.
