जागावाटपावरून रस्सीखेच, काँग्रेस- ठाकरे गटातील वादावर संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut on Mahavikas Aghadi Dispute : विधानसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद झाल्याचं समोर आलं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...
महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. अशात दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचं अद्याप भिजत घोंगडं आहे. महाविकास आघाडीत तर जागा वाटपावरून सुरु असलेला वाद हा विकोपाला गेला आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात टोकाचे वाद झाले आहेत. यावादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत जागेसंदर्भात जे प्रश्न होते. त्याच्याबद्दल चर्चा केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची चर्चा झाली आहे. कॉंग्रेस हायकमांड आणि काँग्रेस पक्ष हा सामंजस्याची भूमिका घेणारा पक्ष आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
काँग्रेस- ठाकरे गटातील वादावर राऊतांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची निवडणूक आहे. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हे दिल्लीत आहेत. तिथे त्यांच्या बैठका होत असतात. कोणताही एक विभाग हा एखाद्या पक्षाचा असतो. त्या भागावर एखाद्या पक्षाचा प्रभाव हा नक्की असतो. कोकण- मुंबई, उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याचशी भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. विदर्भातील एखाद दुसरी जागा सोडली तर आमच्यात फार मतभेजद आहेत, असं मला वाटत नाही. एका जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात, त्यातून मार्ग काढावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसची प्रतिक्रिया काय?
नाना पटोले यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी उद्या येणार आहे. महायुतीमध्येही संभ्रम सुरू आहे. आमच्यात कुठलेही वाद नाहीत. काल काही कारणास्तव आमची सीईसी रद्द झाली, आज होतेय. विदर्भातील कुठल्याच जागे बाबत वाद नाहीत, असं म्हणत नाना पटोले यांनी ठाकरे गटासोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. खर्गेसोबतच्या बैठकीमध्ये नाराजी बाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं नाना पटोले यांनी म्हणालेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेसोबत आमच्यात कोणतेही वाद नाहीत. थोड्याफार प्रमाणात असलेल्या जागाबाबत लवकरच तोडगा निघेल, असं चेन्नीथला म्हणालेत. महाराष्ट्रात प्रचारासाठी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी येतील. प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.