Mayor पदासाठी अनेक दावेदार, कुणाच्या गळ्यात पडणार महापौर पदाची माळ, मीरा भाईंदरपासून ते जालन्यापर्यंत कुणाला लॉटरी लागणार?
Municipal Corporation Mayor 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची आज सोडत निघाली. सोडतीने अनेकांच्या महापौर होण्याच्या स्वप्नांना धुमारे फुटले आहेत. राज्यातील विविध महापालिकेतील दावेदारांची संख्या वाढली आहे. मीरा भाईंदरपासून ते जालन्यापर्यंत कुणाला लॉटरी लागणार? जाणून घ्या...

Municipal Corporation Mayor 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची मुंबईत आज सोडत निघाली. या सोडतीमुळे अनेकांच्या महापौर पदाचे स्वप्न टप्प्यात आले आहे. राज्यातील १५ ठिकाणी महिला राज आले आहे. मराठवाड्यातील चार महापालिकेत महिला महापौर बसणार आहे. जर परभणीतही तसाच निर्णय झाला तर मराठवाड्यातील राजकारणात एका विक्रमाची नोंद होईल. अनेक जण महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. काहींच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले तर अनेक जण अचानक स्पर्धेत आले आहे. मीरा भाईंदरपासून ते जालन्यापर्यंत कुणाला लॉटरी लागणार? कोण आहेत ते दावेदार, जाणून घ्या.
ठाण्याच्या महापौर शर्यतीत ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता अनुसूचित जातीसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोईर आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या डॉ.दर्शना जानकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर पुरुषांमध्ये गणेश कांबळे यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मीरा भाईंदर मध्ये महापौरच्या रेस मध्ये कोण कोण?
1) हसमुख गेहेलोत
2) ध्रुव किशोर पाटील
3) प्रशांत दळवी
4) अनिता पाटील
5) शानू गोयल
धुळे महानगरपालिका
धुळे महानगरपालिकेत महापौर पद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालं आहे. याठिकाणी खुल्या प्रवर्गातील महापौर असेल. याठिकाणी दोघांची नावं दावेदार म्हणून सध्या समोर येत आहे. यामध्ये डॉक्टर निशा महाजन संजय जाधव आणि मायादेवी परदेशी यांचं नाव समोर येत आहे.
जळगावमध्ये दावेदारांची जोरदार चर्चा
जळगाव महापालिकेसाठी महापौर पद ओबीसी महिला आरक्षण राखीव झाले आहे. ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपकडून दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, माधुरी बारी, वैशाली पाटील, रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे हे चौथ्यांदा नगरसेवक झाले असल्याने निष्ठावंत म्हणून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
तर सर्वसाधारण गटातून विजयी झालेल्या रंजना वानखेडे, वंदना इंगळे आणि गायत्री राणे या तिघांकडे ओबीसी प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर त्यांनाही संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. तर वैशाली पाटील या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमित पाटील यांच्या त्या पत्नी असल्याने त्यांनाही संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. ओबीसी महिला राखीव आरक्षण निघाल्याने गेल्या वेळी प्रमाणे यंदा देखील महापालिकेवर महापौरपदी महिलाच विराजमान होणार असून महापालिकेत महिलाराज पाहायला मिळणार आहे.
जालन्यात तीन नावांची चर्चा
जालना महानगरपालिकेचे महापौरपद हे एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. अनुसूचित जाती महिलांपैकी भाजपच्या डॉ. रीमा काळे, वंदा मगरे, श्रद्धा साळवे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या तीन नगरसेविकांपैकी आता कुणाला महापौर पदाची पहिल्यादांचा लॉटरी लागते हे पण लवकरच समोर येईल.
नागपूरमध्ये पाच जणांच्या नावाची तुफान चर्चा
नागपूर महानगर पालिका महापौर पद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झालं. त्यामुळे महापौर पदाच्या रिंगणात अनेक महिला आहेत. त्यापैकी प्रमुख दावेदार
1) शिवानी दाणी
2) अश्विनी जिचकार
3) मायाताई इवनाते
4) दिव्या धुरडे
5) नीता ठाकरे
सोयीनुसार आरक्षण काढलं
तर आजच्या महापौर आरक्षण सोडतीवर काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी तोंडसुख घेतले. हे आपल्या सोयी नुसार केलेलं आरक्षण आहे. नागपूरात सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झालं ते ठरलं होतं मी नाव सुद्धा सांगतो. शिवानी दाणी महापौर होणार असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. मुंबईत ठाकरे गटाने घेतलेला आक्षेप खरा आहे, असेही ते म्हणाले.
