नोकरीचा पहिला दिवस ठरला अखेरचा, नवी मुंबईत ड्रायव्हरची हत्या

नवी मुंबईतील कोपरखैरणेत 23 वर्षीय गयासागर मिश्रा या ओला टॅक्सी चालकाची सोमवारी हत्या झाली होती. गर्दुल्ल्यांनी लूटून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे

नोकरीचा पहिला दिवस ठरला अखेरचा, नवी मुंबईत ड्रायव्हरची हत्या

नवी मुंबई : कोपरखैरणेमधील ओला चालकाच्या हत्या प्रकरणाचा (Navi Mumbai Cab Driver Murder) उलगडा झाला आहे. ड्रायव्हरला लुटण्याच्या प्रयत्नात गर्दुल्ल्यांनी त्याचा जीव घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नोकरीचा पहिला दिवसच त्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला.

23 वर्षीय गयासागर मिश्रा या ओला टॅक्सी चालकाची हत्या झाल्याची घटना सोमवारी कोपरखैरणेत उघडकीस आली होती. गयासागर मूळ मध्यप्रदेशचा राहणारा असून नोकरीसाठी नवी मुंबईत आला होता. गोठीवलीमध्ये नातेवाईकांकडे मुक्कामाला आल्यानंतर तो ‘ओला’च्या टॅक्सीवर चालक म्हणून नोकरीला लागला होता.

नोकरीच्या पहिल्याच दिवशी गयासागरची नाईट शिफ्ट होती. सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास कोपरखैरणेमधील सेक्टर नंबर चारजवळ गयासागरची चाकूने भोसकून हत्या (Navi Mumbai Cab Driver Murder) करण्यात आली. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघा गर्दुल्ल्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी आकाश नवघने आणि किरण चिकणे हे दोघेही अंमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. ते दोघे सेक्टर चार मधील आदर्श बार समोरुन मिश्राच्या टॅक्सीत प्रवासी म्हणून बसले.

प्रख्यात चित्रकार शिरीन मोदींची हत्या, मारेकऱ्याचाही घरातच पडून मृत्यू

सर्व्हिस रोडने गाडी नेण्यास सांगून दोघांनी 300 मीटर अंतरावर एकांताच्या ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. आकाश आणि किरण गयासागरचा मोबाइल आणि त्याच्याजवळ असलेले पैसे लुटून पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीत त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

कोपरखैरणेतील या भागात चोर-गर्दुल्ल्यांचा वावर असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे लूटमार होण्याच्या घटना वाढल्याचं स्थानिक सांगतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI