राष्ट्रवादीच्या कोअर टीमची तातडीची बैठक, धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीच्या कोअर टीमची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (NCP Core Team Meeting)

राष्ट्रवादीच्या कोअर टीमची तातडीची बैठक, धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर चर्चा

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि त्यानंतर मुंडे यांनी दिलेली विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन चांगलच राजकारण तापलं आहे.  या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर टीमची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत. (NCP Core Team Meeting Discussion Dhananjay Munde Allegation)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी राष्ट्रवादीच्या कोअर टीमची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहे. या बैठकीत धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली. त्याआधी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते.

मुंडेंवर गंभीर आरोप, पक्ष म्हणून दखल घेतलीय-  शरद पवार

“ धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे असंही विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी रोखठोक भाष्य केलं. मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य : धनंजय मुंडे

बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे. आरोपांनंतरही ते वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज (14 जानेवारी) त्यांनी जनता दरबारही घेतला आणि विविध नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या. मात्र यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता

यावेळी धनंजय मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली. “मी माझी भूमिका मांडली आहे. वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. आता पक्ष आणि पवारसाहेब यावर निर्णय घेतील.” असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांनंतर दोन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांनंतर फेसबुकवर पोस्ट करून, आरोप करणारी रेणू शर्मा (Renu Sharma) ही करुणा शर्माची (Karuna Sharma) बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. (NCP Core Team Meeting Discussion Dhananjay Munde Allegation)

संबंधित बातम्या : 

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट

Published On - 10:24 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI