मुंबई : “विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे,” असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. “महापालिका व प्रशासन यांनी जबाबदारीने वेळीच योग्य कार्यवाही केली असती, तर आज हे निष्पाप जीव वाचू शकले असते. परंतु महापालिकेने बांधलेली निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत या दुर्घटनेला कारणीभूत आहे. त्यामुळे या दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी व या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या दोषींविरुध्द कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही दरेकर यांनी केली.
तसेच मुंबई परिसरात ज्या भागात अशा प्रकारच्या संरक्षक भिंती बांधल्या आहेत त्याठिकाणच्या रहिवाशांची सुरक्षिततेची व्यवस्था महापालिकेने तात्काळ करावी, अन्यथा मुंबईतील पावसाळ्यामुळे अन्य ठिकाणीही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
विक्रोळीमध्ये निकृष्ट दर्जाची संरक्षण भिंत होती, त्यामुळे पावसात घरं पडून निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला! ही जबाबदारी कोणाची आहे? @OfficeofUT महोदय?
केवळ नोटिसा चिटकवून भागणार नाही, @mybmc चे याकडे किती लक्ष आहे? हे यावरून दिसून येते. pic.twitter.com/1i81Lkpex0— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 18, 2021
प्रविण दरेकर यांनी पावसात आज (18 जुलै) विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर व चेंबूरमधील भारतनगर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच त्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबातील मुले-मुली अनाथ झाले आहेत. अशाच एका कुटुंबाची दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण अनाथ झाले आहेत.” त्यांचे सांत्वन करताना दरेकर यांना गहिवरुन आले व ते शोकाकुल झाले. या पोरके झालेल्या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण यांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजपतर्फे उचलण्यात येईल, असे वचन दरेकरांनी कुटुंबाला दिले. यावेळी भाजापाचे खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
“विक्रोळी, भांडुप, चेंबूर सारख्या दुर्घटना भविष्यात घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका यासारख्या यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. निष्पाप मुंबईकरांचे बळी रोज जात आहेत. असा एकही पावसाळा नाही गेला ज्यामध्ये मुंबईकरांनी बळी पाहिले नाहीत. प्रशासन व महापालिका यांच्या बेजबाबदारपणाचे हे बळी आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर गेली वर्षोनुवर्षे पाणी तुंबण्याची ठिकाणे तीच तीच आहेत. तरीही पालिका हे थांबविण्यासाठी काहीही ठोस व कायमस्वरुपी यंत्रणा उभी करत नाही. विक्रोळीची जी भिंत पडली ती पूर्वीही पडली होती, ती पुन्हा बांधली. पण त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. त्यामुळे रहिवाशांचा नाहक बळी गेला. जे बळी गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आता तरी कडक उपाययोजना करा,” असं दरेकर यांनी सांगितलं.
“मुंबईकरांचे आणखी बळी घेऊ नका. आता केवळ पालिकेने धोक्याची नोटीस बजावून त्यांची जबाबदारी सुटत नाही. त्या रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेची आहे. नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?” असा सवाल दरेकर यांनी केला.
ते म्हणाले, “माणूस आपला जीव गेला तरी चालेल पण आपले छोटे घर का सोडत नाही. कारण ते घर त्यांच्या मेहनतीने घेतलेले असते आणि दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन त्याला राहावे लागते. जर आपण पालिका व प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था केली, तर लोक त्या ठिकाणी मरणार नाही. आता या प्रकरणाची चौकशी समिती लावली जाईल. 8 दिवसांनी सगळे शांत होईल. तथापि या दुर्घटनेची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी.”
Pravin Darekar demand investigation of wall collapse incident in Mumbai