
Pune Municipal Corporation Election : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीमध्येच राडा सुरू आहे. भाजपविरोधात उपमुख्यमंत्री अजितदादांनी आघाडी उघडली आहे. 70 हजार कोटींचा आरोप असून सुद्धा मी आरोप करणाऱ्यांसोबतच सत्तेत असल्याचे वक्तव्य अजितदादांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर एकच काहूर उठलं. तर भाजपच्या त्रिकुटाने केंद्र आणि राज्य सरकारचा निधी मंजूर असूनही पुण्याचा संथगतीने कामे केल्याचा आरोप दादांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांविरोधात जोरदार आघाडी उघडली. तुम्ही इतके वर्ष पालकमंत्री होतात, तर मग भरीव काम का केलं नाही असा सवाल दादांना विचारण्यात आला. तर या सभेत फडणवीस यांनी दादांना थेट इशारा दिला.
शरीफ हैं हम…
यावेळी शेरोशायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या विधानांचा समाचार घेतला आणि त्यांना इशारा दिला. “शरीफ हैं हम, किसी से लडते नहीं, वरना जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दादांना दिला. तर गेल्या पाच वर्षांत आम्ही केलं हे विचारत असाल तर तुम्हाला आरशात तोंड बघावे लागेल असा टोलाही फडणवीसांनी लगावला. त्यामुळे आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आल्याचे दिसून येत आहे.
कात्रज येथील सभेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दादांवर टीकेची झोड उठवली. पुणेकर आता महापालिकेतील विरोधकांना सत्तेत येऊ देणार नाही असा दावा मोहोळ यांनी केला. तर दादा इतक्या वर्षांपासून पुण्याचे पालकमंत्री होते, मग त्यांच्या काळात या शहराचा भरीव विकास का केला नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
तर मग चर्चा बरीच मागे जाईल
बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी ही गझल पुणेकरांना यानिमित्तानं आठवत असेल. कारण मुख्यमंत्र्यांनी या सभेत अजितदादांना मोठा चिमटा काढला. त्यांनी शेरशायरीतून दादांना मोठा इशारा देत टीकेला लगाम लावण्याचेच जणू संकेत दिले. पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होत आहे. ते दादा बोलत आहेत. हे दादा बोलत आहेत. आण्णाही बोलत आहेत. निवडणुकीचा रंग भरत असताना जितकी मागे ही चर्चा जाईल. तेवढे तुम्ही काय केले हे लोकांना सांगावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. उत्तर दिलं नाही तर लोक दुर्बल समजतात. पण आमचा निवडणुकीचा फोकस हा विकासावर असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी पुण्यात 3 हजार कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात केल्याचे आणि सध्या पुण्यात 9 हजार कोटी रुपयांची कामं सुरु असल्याचे उत्तर त्यांनी अजितदादांना दिले.