तेव्हा राज ठाकरेंचे कथित सैनिक कुठे होते? थेट मार्कोस कमांडोचा सवाल
Marcos Commando Asked Raj Thackeray : मराठी भाषेवरून वादच झालाच तर कानफडात मारा, पण त्याचा व्हिडिओ तयार करू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी कालच्या विजयी महामेळाव्यात केले होते. त्यावर माजी मार्कोस कमांडो प्रवीण तेवतिया यांनी राज ठाकरे यांना सवाल केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे 18 वर्षांनी एकत्र मंचावर दिसले. दोघांच्या भाषणात मराठी, मराठी माणसांवर दादागिरी कराल तर गुंडगिरीची भाषा करावी लागेल असा सूर होता. राज ठाकरे यांनी मराठीवरून वाद झालाच तर कानफडात मारा, पण त्याचा व्हिडिओ काढू नका असे वक्तव्य केले. त्यावर माजी मार्कोस कमांडो प्रवीण तेवतिया यांनी नाराजी व्यक्त केली. तेवतिया यांनी 2008 मधील मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात मोर्चा सांभाळला होता.
मार्कोस कमांडोच्या भावना काय?
तेवतिया यांनी कमांडो ड्रेसमध्ये एक्स या सोशल अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात 2008 मध्ये तथाकथित पक्षाचे सैनिक कुठे होते असा सवाल त्यांनी केला. उत्तर प्रदेशात राहणारे तेवतिया हे मुंबईत ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी लढले. त्यांनी त्यांच्या पथकाचे नेतृत्व केले. 26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी मी मुंबईला वाचवले. मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले. मी उत्तर प्रदेशातून आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरे यांचे हे सैनिक कुठे होते? असा सवाल त्यांनी केला. देशाचे तुकडे करू नका. हसण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नसते, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. प्रवीण तेवतिया यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलमधून दहशतवाद्यांना टिपले होते. या ऑपरेशन दरम्यान त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या.
#WATCH | Delhi: On the Marathi language row, ex-Marine Commando Praveen Kumar Teotia, who led the team during the counter-terrorist operations after the 26/11 attack at Mumbai’s Taj Hotel, says, “When the 26/11 terrorist attack happened, their (MNS) so-called warriors hid and… pic.twitter.com/PYwA5Zt9IB
— ANI (@ANI) July 6, 2025
हिंदी सक्तीविरोधात विजयी महामेळावा
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर काढला होता. त्यात सुधारणा केली होती. त्याला महाविकास आघाडीने विरोध केला होता. तर राज ठाकरे यांनी सुद्धा त्याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर दोन्ही बंधू हे 5 जुलै रोजी मोर्चा काढणार होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर केले. मग ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेण्याचे जाहीर केले.
काल दोन्ही ठाकरे 18 वर्षांनी एकत्र आले. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला होता. हिंदी लादून घेणार नाही, असे ही त्यांनी सरकारला थेट संदेश दिला. यावेळी मुंबईत कोणताही भाषिक येवो त्याला मराठी भाषा आली पाहिजे. जर त्याला मराठी भाषा येत नसेल तर त्याला मारहाण करण्याची गरज नाही. पण तो नाटक करत असेल तर त्याच्या कानाखाली वाजवा. या घटनेचा व्हिडिओ तयार करू नका, असे राज ठाकरे म्हणाले होते.